Name:
Location: Pune, Maharashtra, India

9.03.2006

पुण्यातले गणपती!
आहाहा!
काय तो थाट ... काय ती आरास!
डोळ्याचे पारणे फ़ेडणारा उत्सव!

या वर्षीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, पुण्यातील २३ प्रमूख रस्त्यांवरील ( लक्ष्मी रस्ता, विद्यापीठ रस्ता, म.गां. रस्ता, बाणेर रस्ता ई. ई.) गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीच्या उत्सवातील देखाव्यासाठी एकच विषय निवडला, "चंद्रावरील गणपती"!!! आणि मुख्य म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग चंद्राभ्यास समितीचे भारतातील सभासद सी.द.चंद्रा यान्नी या सर्व देखाव्यांन्ना 'हूबेहूब चंद्रावरचा वाटतोय गणपती' असे प्रशस्तीपत्रक दिल्यामुळे 'सर्वोत्कृष्ट देखावा' पारितोषीकाच्या राजकारणात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला! प्रसिद्ध राजकारणी (यान्ना आपण "क्ष" म्हणू! नसत्या वादात कशाला पडा!) "क्ष" यांच्या मंडळाने या "चंद्रावरील गणपती" ला बक्षीस देण्यास जोरदार आक्षेप घेतल्यामुळे यावर्षी "सर्वोत्कृष्ट गणपती" बरोबरच "सर्वोत्कृष्ट चंद्रावरील गणपती" हे नविन बक्षीस जाहीर करण्यात आले! २३ जणांमध्ये बक्षीस वाटून देण्याची ही जगाच्या इतिहासातली पहिलीच वेळ असेल! या सर्वांवर कडी करणारी गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व २३ मंडळांनी आपल्या यशाचे श्रेय गणपती बाप्पाला न देता 'पुणे म.न.पा. व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( हो हो! कुठल्याही घाटात "अपघाती जागा ... सौजन्य म.रा.र.वि.म." लिहिलेल असत त्यातल म.रा.र.वि.म.!) यान्नी संयुक्तपणे राबवलेल्या एकात्मीक खड्डे विकास योजनेला दिलय!

पुणेकरांच्या गणपती पाहण्याच्या उत्साहाला आळशी आणि घरबशी लोक उगाच नाव ठेवतात. "काय ती तोबा गर्दी" "कोण जाणार त्या गदारोळात, मला तर बाई गुदमरायला होत" असे संवाद कायमचेच! वर्षातल्या ३६५ पैकी ५ दिवस लोक रस्त्यावर उतरून गणपती बघत चालायला काय लागले, तर ३६० दिवस रस्त्यावर हैदोस घालणा-या वाहनचालकांच्या पोटात दुखायला लागत!अश्याच एका बुडाखाली कार दाबल्याशिवाय घराच्या अंगणातून बाहेर न पडणा-या माणसाने ( पुन्हा एकदा ... श्री. "क्ष" )मला पुणेकर काय चीज असते ते दाखवून दिले!

मी : आज गणपती पहायला जायच का?

क्ष : नाही रे बाबा ! तोबा गर्दी असते ! कार कशी नेणार?

मी : चला की शेठ एक दिवस पायी ! कार रागावणार नाही काही तुमच्यावर एकटे एकटे जाताय म्हणून!

क्ष : पायी! शी! तिथे पाय ठेवायला ही जागा नसते गर्दीत!

मी: ( स्वगत : येवढी अक्कल आहे तर मगाशी कार काढायच कशाला म्हणत होतास रे म्हसोब्या? ) छे! काहीतरीच काय? मी जाउन सगळे गणपती पाहून येणारच! ते ही पायी पायी... पुण्यातल्या रस्त्यावर पाय ठेवायला म्हणून जिथे जिथे जागा शिल्लक असेल तिथे तिथे जाउन माझे हे पाय रोवून येइन! ही माझी भीष्मप्रतिन्या आहे!

"बॅकग्राउंड ला शंख फुंकल्याचा आवाज! आकाशातून सर्व देव माझ्यावर पुष्पवृष्टी करताहेत! ब्रम्हा-विष्णु-महेश आपापल्या जागेवरून यत्किंचीतही न हालता माझ्याकडे पाहून मंद स्मीत करताहेत. आणि माझा मित्र "क्ष" रामायण मालिकेत रामाला भेटायला गेलेला भरत त्याच्या पायांशी जसा लीन होतो तश्या पवित्र्यात माझ्या पायाशी उभा राहून माझे पाय धुतोय" अश्या दिव्य स्वप्नात मी असतानाच "क्ष" चे वासराची शेपटी पिरगाळल्यावर ते ज्या स्वरात ओरडेल, त्या स्वरातले हसणे ऐकू आले व मी परत भूलोकावर ( मर्त्य जगात ... हाय हाय! ) परतलो!

क्ष : नसत्या प्रतिन्या करू नकोस! अरे तुझी प्रतिन्या पूर्ण झाली तर तु कलियुगातला वामन-अवतार ठरशील ... त्याला तीसरे पाऊल टाकायला बळी राजा तरी मिळाला ! तुला या पुण्यात तिसरे पाऊल टाकायला स्वत:चे वाहन बाजुला करुन जागा करुन देणारा "बळीचा बकरा" मिळाला तरी बाप्पा पावला म्हणायचा!

तर "क्ष" ने जमिनीवर खेचल्यापासून व शनवारात राहणारे माझे एक दूरचे नातेवाईक तिंबूनाना यांचे "हॅ हॅ हॅ ... देवळाबाहेरून चपलांची अदलाबदल ( शुद्ध शब्दात सांगायच तर "चोरी"! ) करेल तो भुरटा चोर, आणि गणेशोत्सवात चालत्या माणसाच्या पायतल्या चपला बदलेल तो खरा पुणेकर! " ह्या पुणेकराच्या व्याख्येमुळे गठाळून जावुन तुर्तास मी गणपती बघायला न जाता "विसर्जनाच्या मिरवणूकीची मजा" बघण्यासाठी लक्ष्मी रोडवरील कुंटे चौकातील चिंतुनाना जोशींच्या घराच्या बाल्कनीत २ बाय २ जागेच २० रु. प्रति-तास बोलीवर २ तासांच बूकींग करुन घेतलय! ( "पैसा कुठून आणि कसा काढावा हे फक्त सच्चा पुणेकरच जाणतो" इति चिंतुनाना जोशी )

गणपती बाप्पा मोरया!

1 Comments:

Blogger Nikhil Deshpande said...

Ekdum jhakaas aahe bhava......tumache punyache nirikshan jabradast aahe....

2:12 PM  

Post a Comment

<< Home