anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

8.29.2009

दिवस नेमका कधी सुरु होतो आणि कधी संपतो?

नाही हा प्रश्न वाचून तुम्हाला मी खुळा आहे अस वाटेल कदाचीत! परंतु खरच हल्ली मला हा प्रश्न वरचेवर सतावायला लागलाय. जेव्हा जेव्हा मी रेलवे तिकीट काढायला जातो तेव्हा तेव्हा तर माझ्या विचारांची गाडी हटकून या प्रश्नाशी येउन थांबते.

आता बघा, शनिवारी रात्री, म्हणजे २९ ऑगस्ट च्या रात्री १२:३० ला पुण्याला गाडीत बसायचे असेल तर तिकिट काढताना कुठल्या तारखेचे काढाल? २९ तारीख टाकाल का? टाकलीत तर फसाल कारण रात्री १२ नंतर तारीख बदलते. म्हणजे अगदी विरोधाभासी वाक्यात सांगायचे तर "रात्री १२ नंतर दिवस बदलतो!" आहे की नाही अचंबीत करणारी गोष्ट?

म्हणजे दिवस आणि रात्र या शब्दांना अर्थच नाही? भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट आहे, ध्वजारोहण वगैरे कार्यक्रम सकाळी किंवा दिवसा ७ वाजता होतात. पण तरी सुद्धा नेहरूंनी केलेले भाषण हे शेवटी १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजताच केले होते ना?

आपण इंग्रजांकडून ब-याच गोष्टी जशाच्या तशा उचलल्या, ही त्यातलीच एक.खर म्हणजे रात्री १२ वाजता नवा दिवस सुरु होणार ही कल्पना कोणाची हे शोधून काढणे रंजक ठरेल. कारण भारतीय इतिहासात अशी नोंद असण कठीण आहे. ज्या संस्कृतीने सूर्याला "मीत्र" म्हंटलय ती संस्कृती त्याच्या आगमनानेच नवीन दिवसाचा प्रारंभ करणारी असली पाहीजे, त्याची पाठ वळताच दिवसाचा शुभारंभ करणारी नव्हे!

पण माझ्या मते आपण उप-यांकडून आपल्याला सोयीच्या ठरतील अशाच गोष्टी उचलल्या, चांगल्या असल्या तरी परंतु गैरसोईच्या ठरतील अश्या चांगल्या सवयी मात्र घेतल्या नाहीत. जर नवा दिवस पहाटे ५:३० ला सुरु झाला तर लवकर उठावे लागेल, नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यधुंद होवुन पहाटे ५:३० ला उठणे केवळ अशक्य! त्यापेक्षा १२ पर्यंत धुंद होवुन नवा दिवस सुरु झाला म्हणत १०-१२ तास झोपणे सहज शक्य!

ह्या सर्व विचार मंथनाचा उद्देश असा कि मी आजही वाट बघतोय अशा एका बापुड्याची ज्याला दिवसाचे उत्साहाने स्वागत करणे म्हणजे काय हे कळलेय आणि जो माझ्या येत्या वाढदिवशी मला रात्री १२ ला झोपेतून उठवून ’हॅपी बर्थडे’ न म्हणता सकाळी ५:३०-६:०० ला ’गूड मॉर्निंग’ म्हणत ’हॅपी बर्थडे’ म्हणेल याची.

8.23.2009

घामाचा वास किती लोकांना आवडतो?

बस, लोकल अथवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी सर्वात प्रकर्षाने जाणवणारा गंध म्हणजे घामाचा गंध! आणि हल्लीच्या टापटिपीनी राहाणा-या जगात या वासाला काहीच किंमत नाही. किंबहूना ’अंगाला घामाचा वास येणे’ हा एक कुचेष्टेचा विषय झालाय.

पण भारतासारख्या भौगोलीक पार्श्वभुमी लाभलेल्या देशात घाम हा येणारच! अगदी खर सांगायच तर ’घाम’ आणि ’भारतीय संस्कृती’ यांच एक अतूट नात आहे अस मला वाटत.लहानपणी ’स्कॉलरशीप’ च्या अभ्यासात मराठी म्हणी, वाक्प्रचार यांचा अभ्यास करावा लागायचा. तेव्हा ’घामाचा पैसा’, ’घाम गाळणे’, ’घाम फुटणे’, ’घामाने शिंपणे’ असे अनेक वाक्प्रचार माहित झाले. पण त्यांचा अर्थ कळायला वेळ लागला.

आता विचार करताना मला लहानपणी आई-वडीलांनी दिवसभर बाहेर कामावर राबून परत आल्यानंतर प्रेमाने पोटाशी धरलेले, कुशीत घेतलेले दिवस आठवतात. तेव्हा येणारा घामाचा वास अजुनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा कळण्याच वय नव्हत पण आता समजत की तो घाम त्यांनी आपल्या पोरांच्या उज्वल भविष्यासाठी आटवलेल्या रक्ताच बाय-प्रॉडक्ट होता...पहिल्या पावसानंतर दरवळणारा मृदगंध पुढे येणा-या ’सोनियाच्या पीकाची नांदी’ असतो त्याचप्रमाणे आई-वडिलांनी गाळलेला घाम हा पुढे चालून मुलांच्या आयुष्यात ’सोनियाचे दिन’ यावेत यासाठी असतो.

माझे हे विचार हल्लीच्या ’डी-ओडोरंट’ च्या जमान्यात हास्यास्पद ठरण्याचाच संभव जास्त आहे. परंतु घामाच्या वासाला नाक मुरडणा-या लोकांपाशी माझी एकच विनंती आहे, कधीतरी मनापासून झटून एखाद्या गोष्टीसाठी घाम गाळा. त्या घामाचा वास तुम्हाला नाही आवडला तरी तुमच्या कामामुळे ज्याच भल झालय त्याला विचारा, त्याला हा ’घामाचा वास’ अत्तरापेक्षाही सुगंधी वाटेल.

आणि शेवटी ’दाम करी काम’ ऐवजी ’घाम करी काम’ झाल्यास या देशाचेही भले होईल .. !

4.19.2009


क्रिकेटप्रेमी श्वान ..!

आता लेखाच शीर्षक वाचून कोणाला वाटू शकत की समीर इसापनितीच्या धर्तीवर समीरनिती लिहीणार आहे म्हणून .. पण नाही .. बा वाचका(कोणी असले तर!) घाबरू नकोस..ही गोष्ट आहे क्रिकेटच्या मैदानावरची ...


आता प्रथम ’कुत्र्याविषयी’ ..

काल दिनांक १८ एप्रिलला आय पी एल ला दक्षीण अफ्रीकेत सुरुवात झाली ..भारतातुन ही स्पर्धा दक्षीण अफ्रीकेत हलवल्यामुळे भारतातील अनेक क्रीकेटप्रेमींमध्ये नाराजी आहे .. ऐन मे महिन्यात पोराटोरांच्या सुट्टीच्या वेळेत स्पर्धा म्हंटल्यावर तमाम भारतीय खूश होते .. पण निवडणुकांनीही बरोब्बर हीच वेळ पटकावली आणि तुमच्या आमच्या सारख्या ’आम आदमी’ ला मिळालेले हे सुखही काढून घेतले गेले ..मग काय विचारता? एरवी कितीही मुर्दाडपणे वागला तरी स्वत:च्या सुख-सोयींवर गदा आली की मध्यमवर्गीय मराठी माणूस पेटून उठतो हे आपल्याला सांगणे न लगे .. त्यामुळे गल्ली गल्लीत ( दिल्ली पासून गल्ली पर्यंत हा वाक्प्रचार वापरणे कटाक्षाने टाळले ... आचारसंहीतेचे दिवस आहेत बाबा .. ) चर्चांना उधाण आले .. चर्चेचा विषय एकच ..


"अरे हट... दक्षीण अफ्रीकेत आय पी एल ठेवणे हास्यास्पद आहे .. तिथल्या लोकान्ना काय कळणार मुंबई इंडीयन्स काय चीज़ आहे ते .. तिथे केपटाउन डायमंड्स, जोहानस्बर्ग झूलूज अस काही असत तर गोष्ट वेगळी ... पण मुंबई ईंडीयन्स? गोष्ट पचत नाहीये ... (बात कुछ हजम नही हुई ही मुरलेली ओळ किती सहजपणे मराठीत आणलीय नाही? लेखकांच हे असच असत ... !)
अरे काळ कुत्र येणार नाही तिकडे हे सामने बघायला ..."

पण या सर्व बहाद्दरांना कुठे ठाऊक की ’ब्रँड आय पी एल’ काय चीज आहे आणि तिचे गुप्तहेर कुठे कुठे पसरलेत ..त्यांना हे तरी कुठी माहितीय की पुण्यातील सदाशीव पेठेतल्या वाड्यांना पोखरणा-या वाळवी (आणि त्यात राहणा-या लोकांच्या बिछान्यातील ढेकणं !) पेक्षाही ह्या गुप्तहेरांची पोहोच जास्त आहे ...
नाही तर मला सांगा "काळ कुत्र येणार नाही तिकडे हे सामने बघायला ..." या वाक्याला प्रत्त्युत्तर द्यायला लगेच त्यांनी ऐन सामन्यात खरोखरच मैदानातच "काळ कुत्र" कस काय आणल असत?
आता बोला! ( है कोई जवाब च भाबड भाषांतर .. )

तळटीप : या लेखापासून स्फूर्ती घेउन उद्या मराठीत "दक्षीण अफ्रीकेतला तो क्रिकेटप्रेमी श्वान आणि आपला ते भटक कुत्तरडं" ही म्हण वापरली जाऊ लागली तर त्याची स्फूर्तीस्थान कोण आहे हे चाणाक्षा वाचकांस सांगणे न लगे ..

7.29.2008

दोनच दिवसापुर्वीची गोष्ट. मी आमच्या ऑफ़ीसमधल्या लोकांसमोर माझ्या नुकत्याच पार पडलेल्या 'इंग्लंड-अमेरिका' दौ-याच्या सुरस कथा सांगत उभा होतो. मला त्यांनी विचारलेल्या 'आवडलेल्या ३ गोष्टी' कुठल्या या प्रश्नाला मी ३ शब्दांतच उत्तर दिल.

१. शिस्त
२. सेवा
३. नागरी जाण

आज मी 'सेवा' या शब्दामागे मला अभिप्रेत असलेल्या गोष्टी कुठल्या याचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्यात काही फार मोठ्या अपेक्षांची यादी नसते. मला पैसे घेउन सेवा पुरवणा-यांकडून खालील गोष्टींची अपेक्षा आहे.

१. पैसे घेउन वस्तू दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे न मानता ग्राहकाला त्या वस्तुकडून अभिप्रेत असलेले समाधान त्यास मिळते आहे का नाही हे पाहणे
२. ग्राहकाला 'दैवत' मानणे ही आदर्श संकल्पना बाजुला ठेवली व त्याला 'माणूस' म्हणून वागवले तरी चालेल पण त्याला 'भिकारी' म्हणून वागणूक देउ नये.
३. ग्राहकाला आपल्यामुळे मनस्ताप होणार नाही व आपल्यामुळे त्याच्या सेवेत खंड पडू नये याची काळजी घेणे.

आणि आज मी जेव्हा मला मिळणा-या सेवांकडे बघतो तेव्हा मला माझ्या कुठल्याच अपेक्षांची पुर्तता होताना दिसत नाही. आपल्या देशाच्या अवाढव्य लोकसंख्येमुळे सगळ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणे अशक्य आहे या एकाच सबबीने आपली बोळवण केली जात आहे असे मला वाटते.

अगदी साधे व माझ्या स्वत:च्या घरीच घडत असलेले उदाहरण पहा.

घरी आम्ही जवळपास दीड ते दोन हजार रुपये मोजून ३ महिन्यांसाठीचे इंटरनेट कनेक्शन घेतले.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच इंटरनेट बंद पडल्यानंतर मला व घरच्यांना आलेले अनुभव

१. 'कस्टमर केअर' ला फोन केल्या नंतर कमीत कमी ५ मिनीटे कोणीच फोन उचलत नाही. 'कस्टमर केअर एक्झीक्युटीव' मोकळा नसल्यामुळे ५ मिनिटे गाणी ऐकत बसाव लागत.
२. तुमच नशीब जोरावर असेल आणि फोन उचलला गेलाच तर 'तांत्रीक अडचणीमुळे तुमचे इंटरनेट बंद आहे, एक दोन दिवसात सुरु होईल' असे ठोकळेबाज उत्तर मिळते. तुम्ही जास्तच खोलात जात असाल तर दोन तीन वेळा तुम्हाला मॉडेम चा कुठला दिवा लागतोय / बंद होतोय हे बघण्यास सांगितले जाते. त्यानंतर 'ईंजीनीअर पाठवतो घरी' असे सांगून तुम्हाला लटकविले जाते.
३. ईंजीनीअर घरी न आल्यामुळे जेव्हा तुम्ही परत फोन करता तेव्हा परत पहिल्या दोन पाय-या पुर्ण केल्या की मग तुम्हास 'तांत्रीक बाबी हाताळणा-या एक्झीक्युटीव्ह' कडे हस्तांतरीत करण्यात येते. येथे पुन्ह ५-१० मिनिटे गाणी ऐकल्यानंतर तुम्हाला २४ तासात काम होईल असे सांगितले जाते. तुमच्या भागात केबलचे काम चालु असल्या कारणाने सेवा बंद आहे असे गूळगूळीत उत्तर तुम्हाला मिळते. आणि पुन्हा काही प्रश्न असल्यास कृपया पुढील नंबर वर संपर्क साधा म्हणून पुन्हा पहिल्या 'कस्टमर केअर एक्झीक्युटीव्हचाच' क्रमांक दिला जातो!
४. शेवटी तुमची सेवा जवळ पास १०-१२ दिवसांनंतर पुर्वपदावर येते, पण या मागे तुम्ही दिलेल्या तक्रारीचा काहीच हात नसतो, ती तुमच्या सेवा पुरवणा-याची मर्जी असते!

वरील उदाहरणात ग्राहक कसा लुबाडला जातो याचे विवरण

१. 'कस्टमर केअर' क्रमांक 'टोल-फ़्री' नसल्यामुळे 'कस्टमर केअर एक्झीक्युटीव्ह' नसल्यामुळे ग्राहक जी एकच टेप वारंवार ऐकतो त्याचे ग्राहकाला पैसे लागतात !
२. आपल्य चुकीने ग्राहकाच्या सेवेत खंड पडत असल्यास त्यास योग्य तो मोबदला दिला जात नाही. ३ महिन्याच्या पॅकेज मधले १५ दिवस जर इंटरनेट बंद असेल तर ग्राहकाला ३ चे सव्वा तीन महिने करुन मिळत नाहीत. म्हणजे भरलेले पैसे ३ महिन्यांचे पण प्रत्यक्ष सेवा मिळणार अडीच महिने !
३. माझा सर्वात मोठा आक्षेप आहे तो म्हणजे जर सेवा पुरविणा-याला 'तांत्रीक अडचणींबद्दल' माहिती आहे तर ग्राहकाला आधीच फोन करून तुमची सेवा अमुक ते तमूक तारखे पर्यंत बंद राहणार आहे हे आधीच का सांगितले जात नाही? एरवी तुमची मुदत संपत आली आहे, मुदत वाढवायला अमुक तारखेच्या आत फी भरा असे मंजूळ आवाजात सांगणारे फोन बरे येतात?

आणि सर्वात विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे मी सांगीतलेले उदाहरण भारतातील सर्वात प्रगत समजल्या जाणा-या मुंबई शहरातील आहे ! जिथे मुंबईचीच ही स्थिती तिथे देशभरात काय अवस्था असेल?

1.02.2008

अ: अरे ते 'अमुक अमुक' काम केलस का?
ब: नाही रे! वेळच नाही मिळाला. मनात असुनही काम करता येत नाहीत. वेळच नाहीये!

इथे वरच्या संवादात 'अमुक अमुक' च्या जागी काहीही घातल तरी खालच उत्तर मात्र ९९.९९% वेळा अगदी तेच राहत.

'वेळच मिळत नाही' ही सबब मी स्वत: अनेक ठिकाणी पळवाट म्हणून वापरतो. ब-याचदा वरील संवादाच्या 'अ' आणि 'ब' या दोन्ही ठिकाणी मी स्वत:च असतो आणि माझ मन 'ब' ला झुकत माप देत. त्यानी तात्पुरत समाधान मिळत, पण मनाला ते पटत नाही.

आज हा सर्व उहापोह करण्याच कारण म्हणजे बरोब्बर एक वर्षापुर्वी मी केलेल्या संकल्पांचा आढावा घेताना माझ्या लक्षात आलय की सालाबादप्रमाणे याही वेळी "योजलेल्या संकल्पांची पूर्ती करण" हा संकल्प करायला हवा होता अस वाटायला लागलय! आणि या संकल्पपुर्तीतला अडथळा एकच .. "वेळ मिळत नाही" !

या वर्षी एकच संकल्प केलाय. "वेळच मिळत नाही" ही सबब सांगायची वेळच येउ द्यायची नाही!

"केल्याने होत आहे रे .. आधी केलेची पाहिजे" हा मंत्र लक्षात ठेवायचा ...

आणि हो, लिहून संपण्यापुर्वीच .. "नुतनवर्षाभिनंदन" !

नाहीतर नंतर कोणी "सगळ लिहिलत आणि येवढच कस विसरलात" अस विचारल तर सांगाव लागायच "नाही हो...लक्षात होत तस ... पण वेळच मिळाला नाही शेवटी ते लिहायला! ..." !

7.12.2007

सतत कच खाणा-या तरीही जगातली सर्वात जबरदस्त 'बॅटींग ऑर्डर' म्हणवल्या जाणा-या भारतीय फलंदाजीस अर्पण ..

4.29.2007

"जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता ..."

रविंद्रनाथ टागोरांनी रचलेल्या या गीताला भारताचे "राष्ट्रगीत" होण्याचा मान मिळून ५० वर्षांहून जास्त काळ लोटला.तेव्हापासून भारतात जन्मलेल्या व शिक्षण घेतलेल्या प्रत्येक भारतीयाने हे राष्ट्रगीत कमीत कमी हजार वेळा तरी म्हंटले असेल.

परंतु जसजसे शालेय जीवन संपायला लागते तसतसे राष्ट्रगीत गानाच्या मिळणा-या संध्या कमी होवु लागतात. मध्यंतरी एका अग्रगण्य आय.टी. कंपनीत भारताचे राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा दौरा आयोजीत करण्यात आला होता.तेथे राष्ट्रपतींच्या आगमनाप्रीत्यर्थ राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. येथपर्यंत सर्व ठीक परंतु या कंपनीचे सर्वोसर्वा यानंतर "आमच्या कंपनीत आलेल्या परदेशी पाहुण्यांना अवघडल्यासारखे होइल म्हणून राष्ट्रगीत गानाचा कार्यक्रम न ठरवता राष्ट्रगीताची धून वाजवण्याचे ठरले." असे बोलल्याचे वर्तमानपत्रात छापून आले आणि त्यामुळे भारतीयांच्या गुलाम मनोवृत्त्तीची आणखी एक झलक पहावयास मिळाली.

वस्तुत: राष्ट्रगीत व राष्ट्रीय सण यांबद्दल लोकांच्या मनात असलेले औदासीन्य मला नवीन नाही.भारतातील एक अग्रणी शिक्षण संस्था असलेल्या माझ्या अभियांत्रीकी कॉलेजात जेव्हा १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ला ४००० पैकी उणेपुरे ४०० विद्यार्थी उपस्थीत रहायचे तेव्हाच माझी मान शरमेनी खाली जायची. नोकरदार वर्गाचा तर विचारच करायला नको कारण त्यांनी या दोन दिवसांच महत्व "एक सुट्टी" एवढ्यापुरतच मर्यादीत ठेवलय. एके काळी "मी आजवर एकदाही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविले नाही" म्हणून गर्वानी छाती पुढे काढून चालणारी शाळकरी मुले भविष्यात या दिवसांबाबत एवढी उदासीन कशी होतात?

राष्ट्रगीताबद्दल बोलायचे झाले तर मी शाळा सोडल्या पासून एखाद्या समुहाने एकत्र येउन म्हंटलेले राष्ट्रगीत ऐकलेलेच नाही! पुण्यात अजुनही काही जुन्या चित्रपटगृहात प्रत्येक खेळापुर्वी राष्ट्रगीत वाजविले जाते. पण आश्चर्य असे की त्या सुरात सूर मिसळला तर मोठा प्रमादच घडेल अश्या पद्धतीचे वर्तन तिथे पहावयास मिळेल. सगळे कसे चिडीचूप्प! काही निर्लज्ज लोक तर फ़िदीफ़िदी हसत असतात.

एवढेच कशाला, पुन्हा एकदा आमच्या कॉलेजातच घडलेली घटना ... १४ऑगस्टचा दिवस संपून रात्री १२:०० चे ठोके पडल्याक्षणी आमच्या काही उत्साही मित्रांनी "सावधान" मध्ये उभे राहून त्यांच्या वसतिगृहातच राष्ट्रगीत म्हणावयास सुरुवात केली. १५ ऑगस्ट, १९४७ साली नेहरूंनी लाल किल्ल्यावरून केलेल्या त्या ओजस्वी भाषणानंतर आपल्यावरील गुलामगिरीचे जोखड फेकून देउन नव्याने उभ्या ठाकलेल्या प्रत्येक भारतीयाने त्या रात्री असेच बेभानपणे राष्ट्रीय गीताचे उच्चार केले असतील. "वंदे मातरम" या स्फूर्तीदायक मंत्राचा जयघोष केला असेल! परंतु वसतीगृहाच्या निरीक्षकाला याची काय कल्पना? त्याने या पोरांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली!

वर्षानुवर्षे चालत आलेल्या गुलामीतून हा देश १९४७ला मोकळा झाला पण वैचारीक गुलामगिरीचे काय?आजही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास ६० वर्षांनंतर स्वत:च्याच देशात उभे राहून स्वत:चेच राष्ट्रगान म्हणताना "कुणा विदेशी माणसाला अवघडल्यासारखे होइल" हा विचार आम्ही करावा याहून मोठी वैचारीक दिवाळखोरी ती कुठली?उण्यापु-या ५२ सेकंदात म्हंटले जाणारे हे गीत आम्ही भारतीय म्हणत असताना कोणाला अवघडल्यासारखे होण्याचे कारणच काय? व तसे कोणी आम्हाला सुचविता "ही आमच्या देशाची पद्धतच आहे व आमच्या देशात असताना तुम्हाला या पद्धतीशी जुळवून घ्यावे लागेल" असे उत्तर आपल्याला देता येउ नये? परदेशी व्यक्तीला बरे वाटावे म्हणून करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रगीताच्या गायनाचा कार्यक्रम रद्द करणे हे फक्त कणाहीन भारतीयच करू जाणोत! आजही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात भारतीय माणसासाठी, त्याला त्रास होईल म्हणून कोणी आपली पद्धत, रितीरिवाज बदलल्याची बातमी अजुनपर्यंत तरी माझ्या कानावर आलेली नाही.

नेहमीप्रमाणे "मी हे बोललोच नव्हतो" म्हणून हात झटकले जातील आणि ही बातमीही विस्मृतीत जाईल. परंतु भारतीयांच्या मनातल्या ज्या कप्प्यात 'राष्ट्राभिमान', 'देशभक्ती' या गोष्टी घर करून राहतात, त्या कप्प्यात साठलेली धूळ कधी साफ होईल ...?