anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

1.20.2007

आजचा दिवसच भारी होता!आज सकाळी कंपनीत जायला चटकन बस मिळाली.कंपनीत एकही मिटींग झाली नाही.साहेब दौ-यावर होता.जेवणात गोडाचा शीरा होता!संध्याकाळी इंद्रायणी एक्स्प्रेस पकडायची असल्याने ऑफ़ीसातून पाचलाच निघालो तर समोरच मित्र त्याची चारचाकी घेऊन उभा! मग त्यानी पुणे स्थानकापर्यंत सोडल.

६:०० ला फलाटावर पोचल्यावर आश्चर्याचा धक्का बसला! इंद्रायणी समोर उभी होती आणि तिचे सर्व दरवाजे उघडे होते आणि आतले दिवे पण चालु होते! इंद्रायणी ६:३४ ला म्हणजे नियोजीत वेळेच्या एक मिनिट आधीच निघाली.गाडीत मला खिडकीची जागा मिळाली. बाजुला एक मध्यमवयीन जोडप बसल होत. बाई आणि बुवा या दोघांपैकी कोणीही 'सुटलेल' नव्हत. तिघांसाठी तयार करण्यात आलेल्या त्या बाकड्यावर पहिल्यांदाच तीन लोक विनासायास बसले!गाडीत भिकारी-टाकारी, गाणी म्हणून पैसे मागणारे, कचरा लोटत लोटत आपल्या जागेखाली ढकलून तोच साफ करण्याचे पैसे मागणारे असे फार थोडे ( प्रत्येकी एक ) लोक आले! एकही हिजडा आला नाही!

गाडीत तिकीट-तपासनीस आले! सगळ्या उतारुंकडे तिकीटे होती. कोणीच हुज्जत घालत नव्हते! माझ्या नजरेसमोर कोणतीच सुंदर ललना नव्हती आणि कायम अश्या सुंदर स्त्रियांबरोबर असतो असा अंगरक्षकही (याला हल्ली 'बॉयफ्रेंड' म्हणतात) नव्हता. मुख्य म्हणजे रेलवेच्या संडासाच्या कड्या लागत होत्या आणि संडासात भरपूर पाणी पण होत. आजुबाजुला एकही किरकीरणार आणि 'पोकेमॉन' साठी हट्ट करणार लहान मूल नव्हत! बाजूची दोन माणस रामायणातल्या 'सूग्रीवकांडा'वर वैन्यानीक दृष्टीकोनाने चर्चा करत होती.

मुंबईला पोचल्यावर माझ्या हच मोबाईलने कुठलीही कटकट न करता झटकन 'नेटवर्क' ला आपलस केल! लोकलच्या तिकीटावरून मारामारी, वादावादी झाली नाही. फलाटावर उतरताच समोरच "बोरीवली स्लो" उभी ठाकली. मी चढलेल्या डब्यात इतकी तुरळक लोक होती की मला "ही बांद्रा लोकल तर नाही ना?" हे विचारून घ्याव लागल. लोकल मध्ये मराठीतल्या विविध बाराखड्यांचा उद्धार करत 'मेंढीकोट' खेळत बसलेले चार लोक सुद्धा सापडले!बोरिवली लोकल कांदीवली ते बोरीवली दरम्यान न थांबता बोरिवली स्थानकात शिरली! घराच्या रस्त्याने जाणारी बस बोरिवली स्थानकाच्या बाहेरच सापडली. आणि आमच्या श्रीकृष्ण नगराच्या वेशीवरच एक अतिशय सुंदर मुलगी अगदी रोजची ओळख असल्यासारखी संपूर्ण बत्तीस दात दाखवत ( आडव केळ तोंडात घातल्यावर माणूस जसा दिसेल तश्या बेताने ) हसली! हाय .. ती पाहताच बाला ... कलीजा खलास झाला ...!!

सगळ स्वप्नवतच वाटतय न? इथे मला कुठेही पानचट धक्कातंत्राचा वापर करायचा नाही, वर लिहीलेला शब्द न शब्द खरा आहे!भारतात राहणा-या माणसाच्या आणि ते सुद्धा माझ्यासारख्या फाटक्या माणसाच्या वाट्याला असा दिवसही येउ शकतो यावर लोकांचा कशाला माझाच स्वत:चाही विश्वास बसत नाहीये आणि हे जर स्वप्न असेल तर मी "समीर ऊठ १२ वाजले गधड्या" ही हाक ऐकू यायच्या आतच सगळ लिहून ठेवतो! :-)

1.17.2007

१४ जानेवारीला सुर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' अस म्हणत प्रत्येक मराठी माणूस आपल्या आप्तांना शुभेच्छा देतो. मराठी स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. आणि बरीच लोक मोबाईल द्वारे एकमेकांना "हॅपी संक्रांत" ... "संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा" ... असे संदेश पाठवतात.

पण १४ जानेवारी हा दिवस मराठी माणसाच्या इतिहासात मात्र काळा दिवस म्हणूनच ओळखला जातो. १४ जानेवारी, १७६१ साली पानिपताच्या लढाईत अहमदशहा अब्दालीने सदाशीवराव भाउंचा पराभव केला. मराठे अखेरच्या क्षणी हाराकिरी आणि फाजील आत्मविश्वास या दोन गोष्टींमुळे रसातळाला गेले. या युद्धात विश्वासराव पेशवा आणि सदाशिवराव भाऊ असे मराठेशाहीचे दोन आधारस्तंभ धारातिर्थी पडले. मराठ्यांचे जवळपास पस्तीस हजारांचे सैन्य या लढाईत कापले गेले. कित्येक आयांची तरणीबांड पोरं, कित्येक सुवासिनींच्या भाळावरच कुंकू, कित्येक म्हाता-या जीवांच भविष्य आणि मराठेशाहीनी रंगवलेली दिल्ली तख्तावर राज्य करण्याची स्वप्नं या सगळ्या गोष्टी १४ जानेवारी या मकरसंक्रांतीच्या दिवशीच धुळीला मिळाल्या.

आत्मविश्वास खचलेल्या मराठी मनावर या युद्धाचा इतका पगडा बसला की "विश्वास कसा ठेऊ? विश्वास तर पानिपतावरच गेला""परीक्षा कशी झाली काय विचारता? पानिपत झाल ..."असे पराभूत मनोवृत्तीचे दर्शन घडवणारे वाक्प्रचारच तयार झाले आणि सर्रास वापरले जाउ लागले.

आज आपण "हॅपी संक्रांत" वगैरे जरी म्हणत असलो, तरी मराठीत संक्रांत या शब्दाचा अर्थ कधीच चांगल्या अर्थाने वापरला जात नाही असे मला वाटते. त्यामुळे अश्या शुभेच्छा देण्यापेक्षा "गोड-गोड(शूभ-शूभ?) बोला" असा सकारात्मक संदेश देणच जास्त संयुक्तीक आहे अस माझ मत आहे.

पानिपताच्या पराभवाच आणि "घरादारावर संक्रांत येणे" या वाक्प्रचाराच घनिष्ट नात हेच तर सुचवत नाही ना?

1.12.2007

"तुम्हाला एखादा खेळ खेळून किती दिवस झाले?" इति 'रेडीओ' मिर्ची'मॅन' अनिरुद्ध उवाच ...सकाळी सकाळी हा प्रश्न ऐकून माझा चेहरा खर्रकन उतरला. समोर 'बॉलींग' करायला कर्टली अँब्रोज उभा आहे हे पाहिल्यावर वेंकटपथी राजूचा चेहरा उतरायचा न अगदी तस्सा ...


खरच किती दिवस झाले एखादा खेळ खेळून ... बारावी संपली आणि आमच क्रिडायुष्य पण संपल! बारावी पर्यंत आम्ही शाळा-'कॉलेजात' जायचो तेच मुळी रिकाम्या ( आणि कधी-कधी भरलेल्या ) वेळात खेळायला मिळायच म्हणून. मला अजुनही ते दिवस आठवताहेत जेव्हा इयत्ता सातवी-क च्या 'क्रीकेट' संघात स्थान मिळावे म्हणून मी तासनतास घरी दोरीला 'बॉल' अडकवून बॅटींगचा सराव करायचो. 'कॅचेस विन मॅचेस' ही उक्ती उभी हयात आंतरराष्ट्रीय क्रीकेट खेळण्यात घालवलेल्या कित्येक क्रिकेटपटूंना समजली नसेल पण मी मात्र ही गोष्ट रडण शिकायच्या आधीच शिकलो होतो अस माझ प्रामाणीक मत आहे.

अकरावीत तर मी माझ्या अष्टपैलू खेळानी मैदान दणाणून सोडल होत. आम्ही त्या वर्षीच बक्षीस पण मिळवल होत क्रीकेट मध्ये! 'रबराच्या बॉलनी' फूटबॉल खेळण्यात तर आमच्या वर्गाचा हातखंडा होता. जगात या खेळाचे मानांकन अस्तित्वात असते तर आम्ही नक्कीच त्यात पहिले स्थान मिळवले असते! या खेळात (की एकमेकांना लाथा घालण्यात ) आम्ही मुल इतकी दंग व्हायचो की आमचे ईंग्रजीचे मास्तर ज्यांचा वर्ग आमच्या दुर्दैवाने मधल्या सुट्टीनंतर लगेचच भरत असे, ते मैदानावर हजेरीपुस्तक घेउन उभे आहेत ह्याकडेही आमच लक्ष जात नसे!


पण शाळा-'कॉलेज' सुटल आणि मैदानी खेळ मागे पडले. आम्ही 'कॉंप्युटर गेम्स' च्या नादी लागलो. प्रत्याक्षात हाणामारी केली की दोन्ही बाजुच्या लोकांना भरपूर लागत हे लहानपणीच कळलेल असल्यामुळे आता संगणकावर बसून मारामारीचे खेळ खेळू लागलो. आणि उत्तरोत्तर त्यात वहावतच गेलो...


नोकरी-धंद्यामुळे तर खेळणच काय, कुणाला खेळताना बघणसुद्धा कठीण झालय! एका जमान्यात खेळताना झालेल्या जखमा अंगावर मिरवत पोरींवर लाईन टाकणारे आम्ही आज साध बोट कापल तरी उच्चारताही येत नाहीत अश्या जडबंबाळ नावांची औषध अंगावर मिरवत फीरतोय.

तर बाबा अनिरुद्धा ... मागे एकदा खडकवासल्याला सहलीला गेलेलो असताना चिखलात फूटबॉल खेळलेल आठवतय. तेवढच ... त्यालाही आत वर्ष झाल ...म्हणजे थोडक्यात गेल्या एक वर्षात मी एकही मैदानी खेळ खेळलो नाहिये आणि हे वाक्य उच्चारताना माझी मलाच लाज वाटतेय ...

1.02.2007

अजुन एक वर्ष आले आणि गेले!गेलेल्या वर्षाने मला अनेक संकल्प करताना व तेच संकल्प काही दिवसानंतर धुळीत मिळवताना बघितले!

हे वर्ष "२००७-बॉन्ड वर्ष" असल्या कारणाने या वर्षीचे मी ७ संकल्प सोडले आहेत.

१. भारत क्रिकेटचा सामना हारला तरी दु:ख मानून घ्यायचे नाही. आपण त्या गावचेच नाही असे दाखवायचे म्हणजे अकारण चिडचीड करणे थांबेल. ( हल्ली लोक भारताच्या पराभवाच्या सुरस कथांना सुरुवात करतात आणि माझ्यातला सच्चा क्रिकेटप्रेमी जागृत झाला की मजा बघत बसतात हे माझ्या लक्षात आलय! )
२. गोविंदाचा चित्रपट चुकूनही बघायचा नाही. हा संकल्प म्हणजे माझ्या "सहनशक्तीचा अंत" कुठे आहे याची जाणीव मला व्हायला लागलीय याचा पुरावा.
३. दिवसातून ४ कप कॉफ़ी प्यायली तर मनुष्य नपूंसक बनू शकतो या धक्कादायक निष्कर्शाच्या सत्यासत्यतेबद्दल प्रयोग न करता दिवसात जास्तीत जास्त ३ ग्लास कॉफ़ी प्यायची. ( आईची शिकवण "विषाची परीक्षा कशाला घ्या?" आयतीच अमलात आणली जाईल! )
४. शाळा-कॉलेजचा कोणताही मित्र भेटला तरी गप्पा मारताना शिक्षकांचा विषय टाळायचा. ( रात्री फार अभद्र आणि भेसूर स्वप्न पडतात नंतर ... )
५. वर्गणी, बक्षीसी, स्वेच्छानिधी('डोनेशन'), दक्षीणा, उधारी या स्त्रीलिंगी चिजांपासून 'सुरक्षीत अंतर ठेवणे'.
६(अ). शक्यतो मुलींना फिरायला घेउन जायचे नाही. आणि गेलोच तर पैशाचे पाकीट घरीच ठेउन मग बाहेर पडायचे.
६(ब). तसेच रोजचा खर्च रोज लिहायचा. अशाने खर्च करण्याची सवय आपोआप जाते असे लोक म्हणतात.
*** ६(अ) संकल्प तडीस जाणे शक्य नाही असे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ६(ब) संकल्पालाही तिलांजली दिली जाईल. कारण मुलींना फिरवले नाही तर खर्च मर्यादीत राहतो असेही बुजुर्ग लोकांचे म्हणणे आहे.
७. "आयुष्यात तू काय काय केल आहेस?" अस नरकाच्या दारावर चित्रगुप्ताने विचारल तर पंचाईत नको म्हणून रोजच्या रोज कंटाळा न करता रोजनिशी लिहायची. ( वरती का खाली पाताळात जिथे कुठे यमाची सभा भरत असेल तेथे 'मायक्रोसॉफ़्ट नेटवर्कींग' पोचले असेल अशी आशा बाळगून ब्लॉगच 'अपडेट' करायचा. अश्या प्रकारे सकारात्मक दृष्टीकोनाचा विकास होईल. )