anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

2.27.2022

वेडात मराठे वीर दौडले सात !


म्यानातून उसळे, तरवारीची पात ।

वेडात मराठे वीर दौडले सात ।


इतिहासातल्या एखाद्या घटनेवर लोककथा, गीतं , पोवाडे रचले जाणे हे काही नवीन नाही. पण ह्या कवितेची बातच निराळी. शिवाजी महाराजांच्या सेनापतीने केलेल्या एका वेड्या साहसाची ही कहाणी. तस बघायला गेलं तर केवळ भावनातिवेगाने एकट्याने शेकड्याने असलेल्या शत्रुसैन्यावर चालून जाणे हा युद्धशास्त्रात निव्वळ मूर्खपणा म्हणून गणला जाईल.  एका लढाईपेक्षा युद्ध जिंकणं कधीही महत्वाचं. एका चुकीचं परिमार्जन करण्यासाठी असा आततायिपणा करणे हा स्वत:च्या युद्धकौशल्याचा अपमानाचा नव्हे काय?

पण महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेल्या या घटनेला कवीने  वेगळ्याच दृष्टीने बघितलंय असं माझं मत आहे. जेत्यांचं कायमच कौतुक होतच असत. पण काही लढाया अश्या असतात ज्यात हारजीतीच्या पलीकडे जाऊन बघावं लागत. आज जवळ जवळ ३५० वर्षांनंतरही ज्यांचं नुसतं नाव घेताच अनंत माणसांची मान आदराने झुकते आणि प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने ताठ होते अश्या शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष सहवास ज्यांना लाभला असेल असे लोक किती भाग्यवान असतील ? आज इतक्या वर्षांनंतरही आपण महाराजांच्या व्यक्तिमत्वाने, कर्तृत्वाने भारावून जात असू तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून शत्रूला भिडणाऱ्या शिलेदारांची कशी अवस्था असेल ?महाराजांचा शब्द हेच आपलं प्रमाण मानणाऱ्या या वीरांमध्ये किती धैर्य असेल ? किती निष्ठा असेल ?आपल्या जीवनाचा क्षण न क्षण , श्वास न श्वास महाराजांच्या हवाली करण्यास तयार होणाऱ्या या शूरवीरांची छत्रपतींवर, त्यांच्या ध्येयावर, किती श्रद्धा असेल ? आणि आपल्यावर विश्वास दाखवून , महत्वाची कामे आपल्यावर सोपवून रयतेचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत झटणाऱ्या शिवरायांना आपले काम चोख न बजावून तक्रारीस वाव द्यावा हे त्यांना किती लाजिरवाणं झालं असेल ?

निगरगट्ट होणे खूप सोपे, पण स्वतःची जबाबदारी ओळखून त्यात कसूर झाल्यास आतून जळणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.अश्या आत्मक्लेशाने पेटलेल्या सेनापती प्रतापराव गुजर आणि आपल्या सेनापतीच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या ६ वीरांनी जर आपण होऊन आपल्या निश्चित मरणाला कवटाळले असेल तर त्यांची स्वामीनिष्ठा कुठल्या पातळीवरची असावी याचा आपण विचारही करू शकणार नाही. महाराजांना ओवाळणारे खूप आहेतच पण त्यांच्यावर आपला जीव ओवाळून टाकणारे त्याहीपेक्षा कैक पट जास्त असणार यात तिळमात्रही शंका नाही. अश्याच अगम्य वेडाने भारलेल्या या साहसी वीरांची कहाणी कवि कुसुमाग्रजांनी शब्दात बांधली आहे. युद्धशास्त्रात असेलही भले चूक, पण त्यामागचे समर्पण उदात्त होते आणि याच विचाराच्या गाभ्यावर ही शब्दकृती निर्माण झाली असावी असं मला वाटत. 

कविता म्हणजे शब्दांची रचना पण याला जेव्हा सुंदर चाल लागते तेव्हा तीच गीत होत. पं. हृदयनाथ मंगेशकरांनी  या कवितेचं रूपांतर उत्कृष्ट गीतात केल आहे. पण जेव्हा लतादीदींचा गळा या शब्दांना त्या चालीवर चालवू लागतो तेव्हा कवितेतील अक्षर न अक्षर बोलू लागते आणि जणू संपूर्ण इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा होतो. 

या सात वीरांना झालेला आत्मक्लेश, त्यांचा आवेश , त्यांच्या अंगात संचारलेली वीरश्री, महाराजांना तक्रारीस जागा दिल्याचे उरात बोचत असलेले शल्य, गनिमांशी चालवलेल्या युद्धातले त्यांचे एकाकीपण आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रसंगास असलेली मन विषण्ण करून सोडणारी वेदनेची किनार या सर्व गोष्टींना लतादीदींच्या अद्भुत गळ्याने , जादूई सामर्थ्याने माझ्या डोळ्यांसमोर नुसते उभेच केले नाही तर मनोपटलावर कायमचे कोरून ठेवले आहे.

१५-२० वर्षांपूर्वी मी हे गाणं पहिल्यांदा ऐकल्या ऐकल्या तोंडपाठ केलं तेव्हापासून मी ते कमीत कमी हजार वेळा ऐकलं असेल पण तरी सुद्धा जेव्हा लतादीदींचा आवाज शेवटच्या कडव्यातल्या ओळींवर पोहोचतो तेव्हा दर वेळी मन सुन्न होत आणि नकळत डोळ्यात पाणी जमा होत. ही शब्दांची किमया म्हणायची कि आवाजाची जादू ?  

या अद्भुत गाण्याची रचना करणारे कुसुमाग्रज आणि त्यांच्या  कवितेला आपल्या जादुई सुरांनी एका वेगळ्याच  उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या लतादीदी  हे आज आपल्यात नसले तरी 'अमर' हा शब्द फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अद्वितीय व्यक्तींच्या कीर्तीसाठीच जन्मास आला असावा असे मला वाटते. आज मराठी भाषा दिनी या दोन मान्यवरांना माझा मानाचा मुजरा!


आणि  हे वेड साहस करून इतिहासाच्या पानांत कुठेतरी हरवून गेल्या सात वीरांसाठी कुसुमाग्रज म्हणालेच आहेत


अद्याप विराणी , कुणी वाऱ्यावर गातं ।

वेडात मराठे वीर दौडले सात ।।