anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

5.13.2018

कर्ता

कर्ता  ! शब्द तसा सुंदर आहे. गणरायाला संबोधताना रामदासांनी त्याला 'सुखकर्ता' असेच संबोधले आहे. म्हणजे सुख निर्माण करणारा. हा शब्द जेव्हा कुटुंबाच्या परिघात वापरला जातो तेव्हा मात्र तो अचानक थोडा संकुचित वाटू लागतो. कारण "घरातला कर्ता पुरुष" ह्या पुरुषी वर्चस्ववादी  वाक्यातूनच ब-याचदा  ओळख होते. किंबहुना 'पती' या शब्दाला 'कर्ता ' हा समानार्थी शब्द आहे हीच शिकवण  कायम दिली जाते व एका अर्थाने ती  समाजात रूढ केली जाते.

कर्ता  म्हणजे करणारा व्यक्ति  असा शब्द असेल तर तो पुरुषवाचक नसून व्यक्तिवाचक असू शकतो का? एखाद्या कुटुंबात, मग ते आजच , एकविसाव्या शतकातलं असो अथवा ई. स. पूर्व ५००० मधल, संसाराचा गाडा हाकणे हे एकाच नसून दोघांचही कर्तव्य असणार हे ओघानं आलं. आपापल्या शक्ती व गुण वैशिष्टयांनुसार स्त्री व पुरुषाने काही कामे वाटून घेतली व प्रथम मूलभूत गरज - अन्न गोळा करण्याचे काम पूर्वी पुरुषांनी आपल्यावर घेतले. काळानुसार यात बदल घडत जाऊन शिकारी वरून अन्न मिळविणे नोकरीवर आले. पण या एकाच कारणावरून पुरुष घरातला कर्ता  ठरतो का?

तस  बघायला गेलं तर याच काळाच्या ओघात स्त्रियांनी स्वत:मध्ये घडवलेले बदल बघितले तर सदैव उत्क्रान्त होत असलेल्या निसर्गाचे कौतुकच वाटेल. वाचून आश्चर्य वाटेल पण शास्त्रज्ञ आता या मतावर आले आहेत की मनुष्य कळपात राहत असल्यापासून स्त्रियांनी कुटुंबात फक्त मुलांचा जन्म , संगोपन ई. जबाबदा-या पार न पाडता संपूर्ण मानवजातीला वरदान ठरलेल्या एका अत्यंत महत्वपूर्ण शोधात आपले भरीव योगदान दिले आहे. तो शोध म्हणजे "शेती " ! होय, बी जमिनीवर पडल्यानंतर रुजते व झाड उगवते हा शोध शिका-यांना लागला नसून स्त्रियांना त्यांच्या अफाट निरीक्षण शक्तीच्या बळावर लागला आहे असे त्यांचे संशोधन सांगते असं माझ्या वाचनात आलेलं आहे.

तर याच स्त्रीयांनी काळाबरोबर पावले टाकत एके काळी पुरुषी सरंजामशाहीच्या वरवंट्याखाली भरडले गेल्यानंतर 'चूल व मूल ' ही बंधन झुगारून आज सर्व क्षेत्रात वेगवान मुसंडी मारली आहे. घरात 'कमविणे' ही एकट्या पुरुषांची मक्तेदारी राहिली नसून सर्वार्थाने सबला झालेल्या  स्त्रिया फक्त पैसाच नाही तर आदरही कमवत आहेत.

साहित्य, कला, क्रीडा असो अथवा सैनिक,वैमानिक, अवकाशवीर ; कोणत्याही क्षेत्रात महिला केवळ आहेत असे नाही तर अग्रेसर आहेत. आणि केवळ घराबाहेरच नव्हे तर ही सर्व शिखरे पादाक्रान्त करताना यासाठी निसर्गाने दिलेल्या आपल्या कर्तव्यालाही तेवढाच न्याय देऊन कुटुंबसंस्था बळकट ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलत आहेत. मग नोकरी सांभाळून मुलांच्या शाळा, अभ्यास, पाहुणे-रावळे, आजारपण , वडिलधा-यांची काळजी व स्वयंपाक , या सर्व जबाबदा-या पार पाडणे ही सोपी गोष्ट नाही.

परंतु दुर्दैवाने आपण आज स्वत:ला कितीही पुढारलेले म्हणवत असलो तरी पण जुन्या विचारांच्या जोखडाला आपण एक समाज म्हणून पूर्णपणे झुगारून देऊ शकलेलो नाही. कुटुंबप्रमुख ही एखादी स्त्री असू शकते हा विचार फार कमी लोकांच्या पचनी पडतो. आणि त्यातूनच मग 'कर्तापुरुष ' वगैरे संकल्पनांचा पद्धतशीर वापर करून पुरुषी महत्व ठसविले जाते.

पण निसर्ग प्रवाही आहे आणि हा प्रवाह कायम चांगल्या बदलांच्या दिशेनी प्रवास करतो. त्यामुळे आता तरी 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' म्हणत या संकल्पना बदलण्याची वेळ आली आहे कार्य येणार-या पिढीला जुनी व शिळी झालेली शिदोरी देण्यात काहीच अर्थ नाही, त्यांचा प्रवास बराच मोठा आहे व त्यांच्या क्षितिजांना विस्तारण्यात नव्या व ताज्या विचारांचा खुराक खूप गरजेचा आहे.

तेव्हा आजच कर्ता म्हणजे पती या विचाराला तिलांजली देऊन कर्ता म्हणजे 'करणारा मनुष्य' या संकल्पनेचा स्वीकार व पुरस्कार  करूया व समाजाला प्रगतिच्या वाटेवर चालते ठेऊया.