anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

2.27.2022

वेडात मराठे वीर दौडले सात !


म्यानातून उसळे, तरवारीची पात ।

वेडात मराठे वीर दौडले सात ।


इतिहासातल्या एखाद्या घटनेवर लोककथा, गीतं , पोवाडे रचले जाणे हे काही नवीन नाही. पण ह्या कवितेची बातच निराळी. शिवाजी महाराजांच्या सेनापतीने केलेल्या एका वेड्या साहसाची ही कहाणी. तस बघायला गेलं तर केवळ भावनातिवेगाने एकट्याने शेकड्याने असलेल्या शत्रुसैन्यावर चालून जाणे हा युद्धशास्त्रात निव्वळ मूर्खपणा म्हणून गणला जाईल.  एका लढाईपेक्षा युद्ध जिंकणं कधीही महत्वाचं. एका चुकीचं परिमार्जन करण्यासाठी असा आततायिपणा करणे हा स्वत:च्या युद्धकौशल्याचा अपमानाचा नव्हे काय?

पण महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेल्या या घटनेला कवीने  वेगळ्याच दृष्टीने बघितलंय असं माझं मत आहे. जेत्यांचं कायमच कौतुक होतच असत. पण काही लढाया अश्या असतात ज्यात हारजीतीच्या पलीकडे जाऊन बघावं लागत. आज जवळ जवळ ३५० वर्षांनंतरही ज्यांचं नुसतं नाव घेताच अनंत माणसांची मान आदराने झुकते आणि प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने ताठ होते अश्या शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष सहवास ज्यांना लाभला असेल असे लोक किती भाग्यवान असतील ? आज इतक्या वर्षांनंतरही आपण महाराजांच्या व्यक्तिमत्वाने, कर्तृत्वाने भारावून जात असू तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून शत्रूला भिडणाऱ्या शिलेदारांची कशी अवस्था असेल ?महाराजांचा शब्द हेच आपलं प्रमाण मानणाऱ्या या वीरांमध्ये किती धैर्य असेल ? किती निष्ठा असेल ?आपल्या जीवनाचा क्षण न क्षण , श्वास न श्वास महाराजांच्या हवाली करण्यास तयार होणाऱ्या या शूरवीरांची छत्रपतींवर, त्यांच्या ध्येयावर, किती श्रद्धा असेल ? आणि आपल्यावर विश्वास दाखवून , महत्वाची कामे आपल्यावर सोपवून रयतेचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत झटणाऱ्या शिवरायांना आपले काम चोख न बजावून तक्रारीस वाव द्यावा हे त्यांना किती लाजिरवाणं झालं असेल ?

निगरगट्ट होणे खूप सोपे, पण स्वतःची जबाबदारी ओळखून त्यात कसूर झाल्यास आतून जळणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.अश्या आत्मक्लेशाने पेटलेल्या सेनापती प्रतापराव गुजर आणि आपल्या सेनापतीच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या ६ वीरांनी जर आपण होऊन आपल्या निश्चित मरणाला कवटाळले असेल तर त्यांची स्वामीनिष्ठा कुठल्या पातळीवरची असावी याचा आपण विचारही करू शकणार नाही. महाराजांना ओवाळणारे खूप आहेतच पण त्यांच्यावर आपला जीव ओवाळून टाकणारे त्याहीपेक्षा कैक पट जास्त असणार यात तिळमात्रही शंका नाही. अश्याच अगम्य वेडाने भारलेल्या या साहसी वीरांची कहाणी कवि कुसुमाग्रजांनी शब्दात बांधली आहे. युद्धशास्त्रात असेलही भले चूक, पण त्यामागचे समर्पण उदात्त होते आणि याच विचाराच्या गाभ्यावर ही शब्दकृती निर्माण झाली असावी असं मला वाटत. 

कविता म्हणजे शब्दांची रचना पण याला जेव्हा सुंदर चाल लागते तेव्हा तीच गीत होत. पं. हृदयनाथ मंगेशकरांनी  या कवितेचं रूपांतर उत्कृष्ट गीतात केल आहे. पण जेव्हा लतादीदींचा गळा या शब्दांना त्या चालीवर चालवू लागतो तेव्हा कवितेतील अक्षर न अक्षर बोलू लागते आणि जणू संपूर्ण इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा होतो. 

या सात वीरांना झालेला आत्मक्लेश, त्यांचा आवेश , त्यांच्या अंगात संचारलेली वीरश्री, महाराजांना तक्रारीस जागा दिल्याचे उरात बोचत असलेले शल्य, गनिमांशी चालवलेल्या युद्धातले त्यांचे एकाकीपण आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रसंगास असलेली मन विषण्ण करून सोडणारी वेदनेची किनार या सर्व गोष्टींना लतादीदींच्या अद्भुत गळ्याने , जादूई सामर्थ्याने माझ्या डोळ्यांसमोर नुसते उभेच केले नाही तर मनोपटलावर कायमचे कोरून ठेवले आहे.

१५-२० वर्षांपूर्वी मी हे गाणं पहिल्यांदा ऐकल्या ऐकल्या तोंडपाठ केलं तेव्हापासून मी ते कमीत कमी हजार वेळा ऐकलं असेल पण तरी सुद्धा जेव्हा लतादीदींचा आवाज शेवटच्या कडव्यातल्या ओळींवर पोहोचतो तेव्हा दर वेळी मन सुन्न होत आणि नकळत डोळ्यात पाणी जमा होत. ही शब्दांची किमया म्हणायची कि आवाजाची जादू ?  

या अद्भुत गाण्याची रचना करणारे कुसुमाग्रज आणि त्यांच्या  कवितेला आपल्या जादुई सुरांनी एका वेगळ्याच  उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या लतादीदी  हे आज आपल्यात नसले तरी 'अमर' हा शब्द फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अद्वितीय व्यक्तींच्या कीर्तीसाठीच जन्मास आला असावा असे मला वाटते. आज मराठी भाषा दिनी या दोन मान्यवरांना माझा मानाचा मुजरा!


आणि  हे वेड साहस करून इतिहासाच्या पानांत कुठेतरी हरवून गेल्या सात वीरांसाठी कुसुमाग्रज म्हणालेच आहेत


अद्याप विराणी , कुणी वाऱ्यावर गातं ।

वेडात मराठे वीर दौडले सात ।।

  

2.22.2020

राधा आणि राधिका

राधा.. हे नाव घेतलं आणि डोक्यात कुठेतरी कृष्णाचं नाव नाही आलं असा भारतीय सापडणं अवघड आहे. राधा कृष्णाच्या जोडीने कवि, शिल्पकार, नर्तक, चित्रकार अश्या अनेकांना भुरळ घातली आहे.

आत्ता इतक्यातच  एकामागून एक २ गाणी माझ्या कानांवर पडली आणि माझं हे विचारचक्र सुरु झालं कारण त्या दोन्ही गाण्यांतील सामान दुवा होता "राधा" ! गाणी  होती लगान सिनेमातील "राधा कैसे ना जले" आणि प्रसिद्ध मराठी गाणं "मी राधिका .. मी प्रेमिका"

दोन्ही गाण्यांची मध्यवर्ती व्यक्तिरेखा एकच - राधा. पण तिची दोन्ही रूप मात्र किती वेगळी आहेत. "राधा कैसे ना जले" मधली राधा कृष्णाची तक्रार करतेय. कृष्ण हा माझा सखा असताना बाकीच्या गोपिकांना हि भाव देतोच कसा हा प्रश्न तिला छळतोय. कृष्ण माझा एकट्याचा आहे अशी एक स्वामित्वाची भावना तिच्या मनात आहे. आणि आपण ज्याच्यावर जीव ओवाळून टाकतोय त्याच्यावर दुसरं कोणी प्रेम करू शकत हा विचार तिला सहन होत नाही. त्यामुळे माझ्यामते राधा च हे रूप एका अल्लड, नव्याने प्रेमात पडलेल्या, थोड्याश्या असुरक्षित असलेया प्रेमिकेचे आहे.

पण "मी राधिका" गाण्यातली राधिका कृष्णाच्या विचारात मग्न आहे. तिला स्वत: आणि कृष्ण सोडून हि जगात काही आहे याच भान उरलच नाहीये. स्वात:च्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक श्वासाचा धनी कृष्ण आहे असं समजून "श्याम क्षण जगले मी" म्हणणा-या राधिकेच्या प्रती एक समर्पण भाव आहे. ती स्वत:आपल्या सख्याच्या सहवासासाठी आसुसले आहे पण तिची कृष्णाकडून ना कसली अपेक्षा आहे ना त्याचा कडे कुठली तक्रार. एखाद्यावर आपले प्रेम असणे म्हणजे त्या व्यक्तीवर आपली मालकी आहे हा विचारही तिच्या मनाला शिवत नाहीये. प्रेमाच्या या साधनेत रममाण झालेली राधिका एका  समंजस, जबाबदार व नि:स्वार्थ प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण वाटते.

राधा आणि राधिका, एकाच व्यक्तीची दोन रूप. एक चांगलं दुसरं वाईट, एक उत्कृष्ट तर दुसरं निकृष्ट असं काही नाही. आपापल्या ठिकाणी दोन्ही विचार योग्य. पण राधेच्या प्रेमात कृष्णाला बांधून ठेवण्याची इच्छा आहे तर राधिकेच्या मनी कृष्णाच्या मागे स्वत:ला झोकून देण्याची इच्छा आहे. यालाच प्रेमाची उत्क्रान्ती म्हणता येईल का? राधेचं  प्रेम पुढे उत्क्रान्त होऊन राधिकेच बनत का?

राधेच्या दृष्टीने सर्व विचार झाल्यावर शेवटी कुठे तरी हा विचार आल्याशिवाय राहात नाही कि कृष्णाला यातलं प्रेमाचं कुठलं रूप जास्त आवडेल ? बंधनात बांधून ठेवणार कि त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याला बंधमुक्त व मोकळं  ठेवणार ?

काय वाटत तुम्हाला ?

1.03.2020

एक प्रश्न


अ :
मला एक प्रश्न पडलाय.
देव म्हणजे काय?
देव असतो का?
मला तर वाटत देव नसतो. कारण जर भूत नसत तर देव पण नसणार.
पण काही जण म्हणतात की देव आकाशात उंचावर असतो. पण मग इतके अंतराळवीर अगदी चंद्रापर्यंत जाऊन आले, त्यांना तर दिसायला पाहिजे होता ना.  तो नाही दिसला म्हणजे नसणार.
काही जण अस ही म्हणतात की देव म्हणजे चांगली माणसं. म्हणजे परत माणूस च ना.



आ  :

देव असतो. आपल्या आजूबाजूला एक शक्ती असते, ती दिसत नसली तरी त्याच अस्तित्व आपल्याला जाणवतं. 
त्यामुळे देव असतोच.
फक्त दिसत नाही म्हणजे ती गोष्ट नसतेच अशातला भाग नाही.
आता हवेचच बघ ना, हवा कुठे दिसते आपल्याला?

अ :
पण हवा "फील" होते ना. देव कुठे "फील" होतो? मग नक्की उत्तर काय आहे माझ्या प्रश्नाच ?


देव आहे का नाही हा प्रश्न अनादी काळापासून मानवाला पडलाय. त्यावर चालू असलेल्या एखाद्या गहन चर्चेतला भाग मी वर लिहिलाय असं तुम्हाला वाटत असेल तर तस काही नाहीये. हा अवघड उत्तर असलेला प्रश्न पडलाय वय वर्ष ७ असलेल्या एका मुलाला. मागच्या पिढीला याच वयात पडणारे प्रश्न लक्षात घेता नुसता प्रश्नच नाही तर विचार करायची पद्धत  फारच प्रगल्भ वगैरे आहे. हल्लीची मूल  फार लवकर मोठा विचार करायला लागली आहेत कि काय? यालाच उत्क्रान्ती म्हणायचं का?

हा संवाद असाच बराच वेळ चालू राहिला असता पण त्यातून एका मोकळ्या मनावर एका विचाराचा शिक्का मारला गेला असता. म्हणून "ब" म्हणजे मी खालील पवित्रा घेतला, बरोबर केल का मी?

ब :
बर  एक काम कर, तुझा प्रश्न एकदम बरोबर आहे.
या प्रश्नाच उत्तर आम्ही देऊ पण ते १०० टक्के बरोबर असेलच असं नाही.
त्यामुळे तू या  प्रश्नाच उत्तर मिळेपर्यंत तुझा  शोध चालू ठेव आणि जस जस तुला उत्तर मिळत जाईल तेव्हा आम्हालाही  सांगत रहा.

5.13.2018

कर्ता

कर्ता  ! शब्द तसा सुंदर आहे. गणरायाला संबोधताना रामदासांनी त्याला 'सुखकर्ता' असेच संबोधले आहे. म्हणजे सुख निर्माण करणारा. हा शब्द जेव्हा कुटुंबाच्या परिघात वापरला जातो तेव्हा मात्र तो अचानक थोडा संकुचित वाटू लागतो. कारण "घरातला कर्ता पुरुष" ह्या पुरुषी वर्चस्ववादी  वाक्यातूनच ब-याचदा  ओळख होते. किंबहुना 'पती' या शब्दाला 'कर्ता ' हा समानार्थी शब्द आहे हीच शिकवण  कायम दिली जाते व एका अर्थाने ती  समाजात रूढ केली जाते.

कर्ता  म्हणजे करणारा व्यक्ति  असा शब्द असेल तर तो पुरुषवाचक नसून व्यक्तिवाचक असू शकतो का? एखाद्या कुटुंबात, मग ते आजच , एकविसाव्या शतकातलं असो अथवा ई. स. पूर्व ५००० मधल, संसाराचा गाडा हाकणे हे एकाच नसून दोघांचही कर्तव्य असणार हे ओघानं आलं. आपापल्या शक्ती व गुण वैशिष्टयांनुसार स्त्री व पुरुषाने काही कामे वाटून घेतली व प्रथम मूलभूत गरज - अन्न गोळा करण्याचे काम पूर्वी पुरुषांनी आपल्यावर घेतले. काळानुसार यात बदल घडत जाऊन शिकारी वरून अन्न मिळविणे नोकरीवर आले. पण या एकाच कारणावरून पुरुष घरातला कर्ता  ठरतो का?

तस  बघायला गेलं तर याच काळाच्या ओघात स्त्रियांनी स्वत:मध्ये घडवलेले बदल बघितले तर सदैव उत्क्रान्त होत असलेल्या निसर्गाचे कौतुकच वाटेल. वाचून आश्चर्य वाटेल पण शास्त्रज्ञ आता या मतावर आले आहेत की मनुष्य कळपात राहत असल्यापासून स्त्रियांनी कुटुंबात फक्त मुलांचा जन्म , संगोपन ई. जबाबदा-या पार न पाडता संपूर्ण मानवजातीला वरदान ठरलेल्या एका अत्यंत महत्वपूर्ण शोधात आपले भरीव योगदान दिले आहे. तो शोध म्हणजे "शेती " ! होय, बी जमिनीवर पडल्यानंतर रुजते व झाड उगवते हा शोध शिका-यांना लागला नसून स्त्रियांना त्यांच्या अफाट निरीक्षण शक्तीच्या बळावर लागला आहे असे त्यांचे संशोधन सांगते असं माझ्या वाचनात आलेलं आहे.

तर याच स्त्रीयांनी काळाबरोबर पावले टाकत एके काळी पुरुषी सरंजामशाहीच्या वरवंट्याखाली भरडले गेल्यानंतर 'चूल व मूल ' ही बंधन झुगारून आज सर्व क्षेत्रात वेगवान मुसंडी मारली आहे. घरात 'कमविणे' ही एकट्या पुरुषांची मक्तेदारी राहिली नसून सर्वार्थाने सबला झालेल्या  स्त्रिया फक्त पैसाच नाही तर आदरही कमवत आहेत.

साहित्य, कला, क्रीडा असो अथवा सैनिक,वैमानिक, अवकाशवीर ; कोणत्याही क्षेत्रात महिला केवळ आहेत असे नाही तर अग्रेसर आहेत. आणि केवळ घराबाहेरच नव्हे तर ही सर्व शिखरे पादाक्रान्त करताना यासाठी निसर्गाने दिलेल्या आपल्या कर्तव्यालाही तेवढाच न्याय देऊन कुटुंबसंस्था बळकट ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलत आहेत. मग नोकरी सांभाळून मुलांच्या शाळा, अभ्यास, पाहुणे-रावळे, आजारपण , वडिलधा-यांची काळजी व स्वयंपाक , या सर्व जबाबदा-या पार पाडणे ही सोपी गोष्ट नाही.

परंतु दुर्दैवाने आपण आज स्वत:ला कितीही पुढारलेले म्हणवत असलो तरी पण जुन्या विचारांच्या जोखडाला आपण एक समाज म्हणून पूर्णपणे झुगारून देऊ शकलेलो नाही. कुटुंबप्रमुख ही एखादी स्त्री असू शकते हा विचार फार कमी लोकांच्या पचनी पडतो. आणि त्यातूनच मग 'कर्तापुरुष ' वगैरे संकल्पनांचा पद्धतशीर वापर करून पुरुषी महत्व ठसविले जाते.

पण निसर्ग प्रवाही आहे आणि हा प्रवाह कायम चांगल्या बदलांच्या दिशेनी प्रवास करतो. त्यामुळे आता तरी 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' म्हणत या संकल्पना बदलण्याची वेळ आली आहे कार्य येणार-या पिढीला जुनी व शिळी झालेली शिदोरी देण्यात काहीच अर्थ नाही, त्यांचा प्रवास बराच मोठा आहे व त्यांच्या क्षितिजांना विस्तारण्यात नव्या व ताज्या विचारांचा खुराक खूप गरजेचा आहे.

तेव्हा आजच कर्ता म्हणजे पती या विचाराला तिलांजली देऊन कर्ता म्हणजे 'करणारा मनुष्य' या संकल्पनेचा स्वीकार व पुरस्कार  करूया व समाजाला प्रगतिच्या वाटेवर चालते ठेऊया.

8.29.2009

दिवस नेमका कधी सुरु होतो आणि कधी संपतो?

नाही हा प्रश्न वाचून तुम्हाला मी खुळा आहे अस वाटेल कदाचीत! परंतु खरच हल्ली मला हा प्रश्न वरचेवर सतावायला लागलाय. जेव्हा जेव्हा मी रेलवे तिकीट काढायला जातो तेव्हा तेव्हा तर माझ्या विचारांची गाडी हटकून या प्रश्नाशी येउन थांबते.

आता बघा, शनिवारी रात्री, म्हणजे २९ ऑगस्ट च्या रात्री १२:३० ला पुण्याला गाडीत बसायचे असेल तर तिकिट काढताना कुठल्या तारखेचे काढाल? २९ तारीख टाकाल का? टाकलीत तर फसाल कारण रात्री १२ नंतर तारीख बदलते. म्हणजे अगदी विरोधाभासी वाक्यात सांगायचे तर "रात्री १२ नंतर दिवस बदलतो!" आहे की नाही अचंबीत करणारी गोष्ट?

म्हणजे दिवस आणि रात्र या शब्दांना अर्थच नाही? भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट आहे, ध्वजारोहण वगैरे कार्यक्रम सकाळी किंवा दिवसा ७ वाजता होतात. पण तरी सुद्धा नेहरूंनी केलेले भाषण हे शेवटी १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजताच केले होते ना?

आपण इंग्रजांकडून ब-याच गोष्टी जशाच्या तशा उचलल्या, ही त्यातलीच एक.खर म्हणजे रात्री १२ वाजता नवा दिवस सुरु होणार ही कल्पना कोणाची हे शोधून काढणे रंजक ठरेल. कारण भारतीय इतिहासात अशी नोंद असण कठीण आहे. ज्या संस्कृतीने सूर्याला "मीत्र" म्हंटलय ती संस्कृती त्याच्या आगमनानेच नवीन दिवसाचा प्रारंभ करणारी असली पाहीजे, त्याची पाठ वळताच दिवसाचा शुभारंभ करणारी नव्हे!

पण माझ्या मते आपण उप-यांकडून आपल्याला सोयीच्या ठरतील अशाच गोष्टी उचलल्या, चांगल्या असल्या तरी परंतु गैरसोईच्या ठरतील अश्या चांगल्या सवयी मात्र घेतल्या नाहीत. जर नवा दिवस पहाटे ५:३० ला सुरु झाला तर लवकर उठावे लागेल, नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यधुंद होवुन पहाटे ५:३० ला उठणे केवळ अशक्य! त्यापेक्षा १२ पर्यंत धुंद होवुन नवा दिवस सुरु झाला म्हणत १०-१२ तास झोपणे सहज शक्य!

ह्या सर्व विचार मंथनाचा उद्देश असा कि मी आजही वाट बघतोय अशा एका बापुड्याची ज्याला दिवसाचे उत्साहाने स्वागत करणे म्हणजे काय हे कळलेय आणि जो माझ्या येत्या वाढदिवशी मला रात्री १२ ला झोपेतून उठवून ’हॅपी बर्थडे’ न म्हणता सकाळी ५:३०-६:०० ला ’गूड मॉर्निंग’ म्हणत ’हॅपी बर्थडे’ म्हणेल याची.

8.23.2009

घामाचा वास किती लोकांना आवडतो?

बस, लोकल अथवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी सर्वात प्रकर्षाने जाणवणारा गंध म्हणजे घामाचा गंध! आणि हल्लीच्या टापटिपीनी राहाणा-या जगात या वासाला काहीच किंमत नाही. किंबहूना ’अंगाला घामाचा वास येणे’ हा एक कुचेष्टेचा विषय झालाय.

पण भारतासारख्या भौगोलीक पार्श्वभुमी लाभलेल्या देशात घाम हा येणारच! अगदी खर सांगायच तर ’घाम’ आणि ’भारतीय संस्कृती’ यांच एक अतूट नात आहे अस मला वाटत.लहानपणी ’स्कॉलरशीप’ च्या अभ्यासात मराठी म्हणी, वाक्प्रचार यांचा अभ्यास करावा लागायचा. तेव्हा ’घामाचा पैसा’, ’घाम गाळणे’, ’घाम फुटणे’, ’घामाने शिंपणे’ असे अनेक वाक्प्रचार माहित झाले. पण त्यांचा अर्थ कळायला वेळ लागला.

आता विचार करताना मला लहानपणी आई-वडीलांनी दिवसभर बाहेर कामावर राबून परत आल्यानंतर प्रेमाने पोटाशी धरलेले, कुशीत घेतलेले दिवस आठवतात. तेव्हा येणारा घामाचा वास अजुनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा कळण्याच वय नव्हत पण आता समजत की तो घाम त्यांनी आपल्या पोरांच्या उज्वल भविष्यासाठी आटवलेल्या रक्ताच बाय-प्रॉडक्ट होता...पहिल्या पावसानंतर दरवळणारा मृदगंध पुढे येणा-या ’सोनियाच्या पीकाची नांदी’ असतो त्याचप्रमाणे आई-वडिलांनी गाळलेला घाम हा पुढे चालून मुलांच्या आयुष्यात ’सोनियाचे दिन’ यावेत यासाठी असतो.

माझे हे विचार हल्लीच्या ’डी-ओडोरंट’ च्या जमान्यात हास्यास्पद ठरण्याचाच संभव जास्त आहे. परंतु घामाच्या वासाला नाक मुरडणा-या लोकांपाशी माझी एकच विनंती आहे, कधीतरी मनापासून झटून एखाद्या गोष्टीसाठी घाम गाळा. त्या घामाचा वास तुम्हाला नाही आवडला तरी तुमच्या कामामुळे ज्याच भल झालय त्याला विचारा, त्याला हा ’घामाचा वास’ अत्तरापेक्षाही सुगंधी वाटेल.

आणि शेवटी ’दाम करी काम’ ऐवजी ’घाम करी काम’ झाल्यास या देशाचेही भले होईल .. !

4.19.2009


क्रिकेटप्रेमी श्वान ..!

आता लेखाच शीर्षक वाचून कोणाला वाटू शकत की समीर इसापनितीच्या धर्तीवर समीरनिती लिहीणार आहे म्हणून .. पण नाही .. बा वाचका(कोणी असले तर!) घाबरू नकोस..ही गोष्ट आहे क्रिकेटच्या मैदानावरची ...


आता प्रथम ’कुत्र्याविषयी’ ..

काल दिनांक १८ एप्रिलला आय पी एल ला दक्षीण अफ्रीकेत सुरुवात झाली ..भारतातुन ही स्पर्धा दक्षीण अफ्रीकेत हलवल्यामुळे भारतातील अनेक क्रीकेटप्रेमींमध्ये नाराजी आहे .. ऐन मे महिन्यात पोराटोरांच्या सुट्टीच्या वेळेत स्पर्धा म्हंटल्यावर तमाम भारतीय खूश होते .. पण निवडणुकांनीही बरोब्बर हीच वेळ पटकावली आणि तुमच्या आमच्या सारख्या ’आम आदमी’ ला मिळालेले हे सुखही काढून घेतले गेले ..



मग काय विचारता? एरवी कितीही मुर्दाडपणे वागला तरी स्वत:च्या सुख-सोयींवर गदा आली की मध्यमवर्गीय मराठी माणूस पेटून उठतो हे आपल्याला सांगणे न लगे .. त्यामुळे गल्ली गल्लीत ( दिल्ली पासून गल्ली पर्यंत हा वाक्प्रचार वापरणे कटाक्षाने टाळले ... आचारसंहीतेचे दिवस आहेत बाबा .. ) चर्चांना उधाण आले .. चर्चेचा विषय एकच ..


"अरे हट... दक्षीण अफ्रीकेत आय पी एल ठेवणे हास्यास्पद आहे .. तिथल्या लोकान्ना काय कळणार मुंबई इंडीयन्स काय चीज़ आहे ते .. तिथे केपटाउन डायमंड्स, जोहानस्बर्ग झूलूज अस काही असत तर गोष्ट वेगळी ... पण मुंबई ईंडीयन्स? गोष्ट पचत नाहीये ... (बात कुछ हजम नही हुई ही मुरलेली ओळ किती सहजपणे मराठीत आणलीय नाही? लेखकांच हे असच असत ... !)
अरे काळ कुत्र येणार नाही तिकडे हे सामने बघायला ..."

पण या सर्व बहाद्दरांना कुठे ठाऊक की ’ब्रँड आय पी एल’ काय चीज आहे आणि तिचे गुप्तहेर कुठे कुठे पसरलेत ..त्यांना हे तरी कुठी माहितीय की पुण्यातील सदाशीव पेठेतल्या वाड्यांना पोखरणा-या वाळवी (आणि त्यात राहणा-या लोकांच्या बिछान्यातील ढेकणं !) पेक्षाही ह्या गुप्तहेरांची पोहोच जास्त आहे ...
नाही तर मला सांगा "काळ कुत्र येणार नाही तिकडे हे सामने बघायला ..." या वाक्याला प्रत्त्युत्तर द्यायला लगेच त्यांनी ऐन सामन्यात खरोखरच मैदानातच "काळ कुत्र" कस काय आणल असत?
आता बोला! ( है कोई जवाब च भाबड भाषांतर .. )





तळटीप : या लेखापासून स्फूर्ती घेउन उद्या मराठीत "दक्षीण अफ्रीकेतला तो क्रिकेटप्रेमी श्वान आणि आपला ते भटक कुत्तरडं" ही म्हण वापरली जाऊ लागली तर त्याची स्फूर्तीस्थान कोण आहे हे चाणाक्षा वाचकांस सांगणे न लगे ..