anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

4.13.2007

मागच्या शनि-रवी घरी गेलो होतो. नेहमी आईला दुस-या चवथ्या शनिवारी सुट्टी असते. माझ्या मुंबईला जाण्याच चक्र मी बरोबर जुळवून घेतलय. शुक्रवारि रात्रीपासुनच आईचे बेत ठरलेले असतात. तिच्या बाळाला चांगल-चुंगल खायला घालायचे! पण या वेळी घरी गेल्यावर कळल की आईला चवथा शनिवार असूनही ऑफीस आहे.
मग शनिवारी सकाळी जाउन दुध घेउन आलो. घरची बँकेची व पोश्टाची काम केली. त्यानंतर माझ्या गाडीच्या लायसन्सच्या कामा-पायी अंधेरीच्या आर.टी.ओ. चा उंबरा झीजवून आलो. आईच्या ऑफीसनी शुक्रवारी अचानक शनिवारी याव लागेल अस सांगितल होत. शनिवारचा संध्याकाळचा पाव-भाजीचा बेत आधीच ठरला होता. आईनी मला पाव आणायला सांगितले होते, ते आणले. आणि हे सगळ करून घरी हाश्श-हूश्श करत होतो तेवढ्यात आई आली. मग आईला चहा करून दिला.

पाव-भाजी करताना आईच्या लक्षात आल 'कोथिंबीर' संपलीय.
"समीर जरा कोथिंबीर आणून देतोस का रे दोन मिनिटात? तुला आवडते ना?" हे आईने म्हंटल्याक्षणी परत बाहेर जाव लागणार या कल्पनेनीच माझा राग-राग झाला.
"आई तुला एकदाच काय-काय आणायचय ते सांगायला काय होत ग?"
आवाजात शक्य तेवढी मृदुता आणून मी निषेध नोंदवला. बाबांनी पण कळेल न कळेल अश्या प्रकारे माझ्या बोलण्याला संमती दर्शवली.

"समीर.. एक दिवस घरची आणि बाहेरची काम करायला सांगितली तर तुझ्या जीवावर आल. तुम्ही लोकांनी कधी विचार केलाय एकाच वेळी ऑफीस-घर-स्वयंपाकघर अस सगळ सांभाळण किती कठीण आहे ते?"

कुणीतरी खाडकन थोबाडीत मारल्यासारखा भानावर आलो.

खरच... शनिवारी सुट्टीच्या दिवशी कामाला जाव लागत असुनही मुलाला दिलेल्या शब्दापायी ऑफीसातून घरी आल्या-आल्या स्वयंपाकघरात झटणा-या त्या माउलीच्या या प्रश्नाला माझ्याकडे काहीच उत्तर नव्हत ...