anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

4.29.2007

"जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता ..."

रविंद्रनाथ टागोरांनी रचलेल्या या गीताला भारताचे "राष्ट्रगीत" होण्याचा मान मिळून ५० वर्षांहून जास्त काळ लोटला.तेव्हापासून भारतात जन्मलेल्या व शिक्षण घेतलेल्या प्रत्येक भारतीयाने हे राष्ट्रगीत कमीत कमी हजार वेळा तरी म्हंटले असेल.

परंतु जसजसे शालेय जीवन संपायला लागते तसतसे राष्ट्रगीत गानाच्या मिळणा-या संध्या कमी होवु लागतात. मध्यंतरी एका अग्रगण्य आय.टी. कंपनीत भारताचे राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा दौरा आयोजीत करण्यात आला होता.तेथे राष्ट्रपतींच्या आगमनाप्रीत्यर्थ राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. येथपर्यंत सर्व ठीक परंतु या कंपनीचे सर्वोसर्वा यानंतर "आमच्या कंपनीत आलेल्या परदेशी पाहुण्यांना अवघडल्यासारखे होइल म्हणून राष्ट्रगीत गानाचा कार्यक्रम न ठरवता राष्ट्रगीताची धून वाजवण्याचे ठरले." असे बोलल्याचे वर्तमानपत्रात छापून आले आणि त्यामुळे भारतीयांच्या गुलाम मनोवृत्त्तीची आणखी एक झलक पहावयास मिळाली.

वस्तुत: राष्ट्रगीत व राष्ट्रीय सण यांबद्दल लोकांच्या मनात असलेले औदासीन्य मला नवीन नाही.भारतातील एक अग्रणी शिक्षण संस्था असलेल्या माझ्या अभियांत्रीकी कॉलेजात जेव्हा १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ला ४००० पैकी उणेपुरे ४०० विद्यार्थी उपस्थीत रहायचे तेव्हाच माझी मान शरमेनी खाली जायची. नोकरदार वर्गाचा तर विचारच करायला नको कारण त्यांनी या दोन दिवसांच महत्व "एक सुट्टी" एवढ्यापुरतच मर्यादीत ठेवलय. एके काळी "मी आजवर एकदाही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविले नाही" म्हणून गर्वानी छाती पुढे काढून चालणारी शाळकरी मुले भविष्यात या दिवसांबाबत एवढी उदासीन कशी होतात?

राष्ट्रगीताबद्दल बोलायचे झाले तर मी शाळा सोडल्या पासून एखाद्या समुहाने एकत्र येउन म्हंटलेले राष्ट्रगीत ऐकलेलेच नाही! पुण्यात अजुनही काही जुन्या चित्रपटगृहात प्रत्येक खेळापुर्वी राष्ट्रगीत वाजविले जाते. पण आश्चर्य असे की त्या सुरात सूर मिसळला तर मोठा प्रमादच घडेल अश्या पद्धतीचे वर्तन तिथे पहावयास मिळेल. सगळे कसे चिडीचूप्प! काही निर्लज्ज लोक तर फ़िदीफ़िदी हसत असतात.

एवढेच कशाला, पुन्हा एकदा आमच्या कॉलेजातच घडलेली घटना ... १४ऑगस्टचा दिवस संपून रात्री १२:०० चे ठोके पडल्याक्षणी आमच्या काही उत्साही मित्रांनी "सावधान" मध्ये उभे राहून त्यांच्या वसतिगृहातच राष्ट्रगीत म्हणावयास सुरुवात केली. १५ ऑगस्ट, १९४७ साली नेहरूंनी लाल किल्ल्यावरून केलेल्या त्या ओजस्वी भाषणानंतर आपल्यावरील गुलामगिरीचे जोखड फेकून देउन नव्याने उभ्या ठाकलेल्या प्रत्येक भारतीयाने त्या रात्री असेच बेभानपणे राष्ट्रीय गीताचे उच्चार केले असतील. "वंदे मातरम" या स्फूर्तीदायक मंत्राचा जयघोष केला असेल! परंतु वसतीगृहाच्या निरीक्षकाला याची काय कल्पना? त्याने या पोरांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली!

वर्षानुवर्षे चालत आलेल्या गुलामीतून हा देश १९४७ला मोकळा झाला पण वैचारीक गुलामगिरीचे काय?आजही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास ६० वर्षांनंतर स्वत:च्याच देशात उभे राहून स्वत:चेच राष्ट्रगान म्हणताना "कुणा विदेशी माणसाला अवघडल्यासारखे होइल" हा विचार आम्ही करावा याहून मोठी वैचारीक दिवाळखोरी ती कुठली?उण्यापु-या ५२ सेकंदात म्हंटले जाणारे हे गीत आम्ही भारतीय म्हणत असताना कोणाला अवघडल्यासारखे होण्याचे कारणच काय? व तसे कोणी आम्हाला सुचविता "ही आमच्या देशाची पद्धतच आहे व आमच्या देशात असताना तुम्हाला या पद्धतीशी जुळवून घ्यावे लागेल" असे उत्तर आपल्याला देता येउ नये? परदेशी व्यक्तीला बरे वाटावे म्हणून करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रगीताच्या गायनाचा कार्यक्रम रद्द करणे हे फक्त कणाहीन भारतीयच करू जाणोत! आजही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात भारतीय माणसासाठी, त्याला त्रास होईल म्हणून कोणी आपली पद्धत, रितीरिवाज बदलल्याची बातमी अजुनपर्यंत तरी माझ्या कानावर आलेली नाही.

नेहमीप्रमाणे "मी हे बोललोच नव्हतो" म्हणून हात झटकले जातील आणि ही बातमीही विस्मृतीत जाईल. परंतु भारतीयांच्या मनातल्या ज्या कप्प्यात 'राष्ट्राभिमान', 'देशभक्ती' या गोष्टी घर करून राहतात, त्या कप्प्यात साठलेली धूळ कधी साफ होईल ...?

4.13.2007

मागच्या शनि-रवी घरी गेलो होतो. नेहमी आईला दुस-या चवथ्या शनिवारी सुट्टी असते. माझ्या मुंबईला जाण्याच चक्र मी बरोबर जुळवून घेतलय. शुक्रवारि रात्रीपासुनच आईचे बेत ठरलेले असतात. तिच्या बाळाला चांगल-चुंगल खायला घालायचे! पण या वेळी घरी गेल्यावर कळल की आईला चवथा शनिवार असूनही ऑफीस आहे.
मग शनिवारी सकाळी जाउन दुध घेउन आलो. घरची बँकेची व पोश्टाची काम केली. त्यानंतर माझ्या गाडीच्या लायसन्सच्या कामा-पायी अंधेरीच्या आर.टी.ओ. चा उंबरा झीजवून आलो. आईच्या ऑफीसनी शुक्रवारी अचानक शनिवारी याव लागेल अस सांगितल होत. शनिवारचा संध्याकाळचा पाव-भाजीचा बेत आधीच ठरला होता. आईनी मला पाव आणायला सांगितले होते, ते आणले. आणि हे सगळ करून घरी हाश्श-हूश्श करत होतो तेवढ्यात आई आली. मग आईला चहा करून दिला.

पाव-भाजी करताना आईच्या लक्षात आल 'कोथिंबीर' संपलीय.
"समीर जरा कोथिंबीर आणून देतोस का रे दोन मिनिटात? तुला आवडते ना?" हे आईने म्हंटल्याक्षणी परत बाहेर जाव लागणार या कल्पनेनीच माझा राग-राग झाला.
"आई तुला एकदाच काय-काय आणायचय ते सांगायला काय होत ग?"
आवाजात शक्य तेवढी मृदुता आणून मी निषेध नोंदवला. बाबांनी पण कळेल न कळेल अश्या प्रकारे माझ्या बोलण्याला संमती दर्शवली.

"समीर.. एक दिवस घरची आणि बाहेरची काम करायला सांगितली तर तुझ्या जीवावर आल. तुम्ही लोकांनी कधी विचार केलाय एकाच वेळी ऑफीस-घर-स्वयंपाकघर अस सगळ सांभाळण किती कठीण आहे ते?"

कुणीतरी खाडकन थोबाडीत मारल्यासारखा भानावर आलो.

खरच... शनिवारी सुट्टीच्या दिवशी कामाला जाव लागत असुनही मुलाला दिलेल्या शब्दापायी ऑफीसातून घरी आल्या-आल्या स्वयंपाकघरात झटणा-या त्या माउलीच्या या प्रश्नाला माझ्याकडे काहीच उत्तर नव्हत ...