anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

3.23.2007

- बांगलादेश भारताविरुद्ध खेळलेल्या १५ पैकी १३ सामने हरलाय.
- बांगलादेशकडे चांगले 'फ़ास्ट बॉलर' नाहीत.
- बांगलादेशने अधुनमधून मोठ्या संघांना हरविले असले तरी त्यांच्या खेळात सातत्य नाही.
- त्यांनी जिंकलेल्या सामन्याची "सट्टेबाजी" च्या प्रकरणासाठी चौकशी केली जाते - इति एक खवचट पुणेकर!
- त्यांच्या संघाचे सरासरी वयोमान २२ वर्षे आहे.


- भारतीय संघात ३००च्या वर सामने खेळलेले ३ खेळाडू आहेत. चौथा २९० च्या आकड्याजवळ आहे.
- भारतीय संघातील ३ फ़लंदाजांच्या नावावर प्रत्येकी दहा हजाराहून जास्त धावा आहेत.
- भारताती बांगलादेशला घरी-दारी सदैव धूळ चारलेली आहे. (एकदाच आपण हरलोय म्हणा .. पण काळे काजळच सौंदर्याला नवे परीमाण देते ...चंद्रावरील डागच चंद्राला स्वर्गीय सौंदर्य बहाल करतात ... अपवादच नियम सिद्ध करतात ... )
- आपण बांगलादेश वगैरे बरोबर खेळण्याच्या फंदातच पडू नये!
- खरा सामना भारत-श्रीलंका यांच्यातच आहे!


दिनांक १७ मार्च
- भारत सर्वबाद १९१ - भारत पूर्ण ५० षटके खेळू शकलेला नाहे.
- भारताचे केवळ ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले (त्यातले दोघे १०व्या आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते!)
- भारताची सामन्यातील दुसरी सर्वोत्तम भागीदारी ११व्या गड्यासाठी झाली
- भारताने २ धावांत ५ गडी गमावले.
- प्रमूख भारतीय गोलंदाजांनी मिळून केवळ ३ बळी मिळवले (२ सेहवागला मिळाले)
- फलंदाजाचा 'कॅच' टाकुन त्याला जीवदान दिल्यानंतर धोणी-भज्जी-युवी त्रयी निर्लज्जासारखी हसत असल्याचे कॅमेराने पकडले.
- भारतीय क्षेत्ररक्षकांनी एकूण ४ संध्या गमावल्या.

या सामन्यातील पराभवाने द्रवीडच्या सामन्यापुर्वीच्या "भारताने प्रतिस्पर्ध्याला कमी लेखू नये" या वाक्याला संघाने कृतीची जोड दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आता खरोखरच "खरा सामना भारत-श्रीलंका यांच्यातच आहे"! ( भारत बर्मूडा बरोबर जिंकेल हा आशावाद बाळगायचा न??)

3.20.2007

दिनांक १७ मार्च २००७. मोठाल्या सॉफ़्टवेअर कंपनीत बसणा-या साहेबाच्या काचेच्या 'चेंबर' पासून ते चहाच्या टपरीपर्यंत, परीक्षा तोंडावर आलेल्या विद्यार्थ्यांपासून ते "अभ्यास करा" म्हणून थकलेल्या आई-बाप-शिक्षक या त्रिमूर्तींपर्यंत, विविध कंपन्यांच्या आकर्षक जाहीरातींना भुलून जोरदार खरेदी करणा-या ग्राहकांपासून ते बक्षीस लागलेल्या काही मोजक्याच पण "कंडीशन्स अप्लाय" च्या चकाट्यात फरफट होणा-या भाग्यवंतापर्यंत म्हणजेच दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत सगळ्यांच्या डोक्यात, मनात, हदयात, ओठात, पोटात म्हणजे एकूणच या भरतवर्षाच्या जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकच नारा ...
हू..हा..इंडीया... आ..या..इंडीया ...


रेडीओवर येउन द्रवीड आणि मंडळी तुम्हाला मागच्या वेळी पहिल्या फेरीत बाद होईल म्हणून हिणवली गेलेली 'टीम इंडीया' कशी अंतीम सामन्यापर्यंत मजल मारून आली ते सांगताहेत. कपिल देव १९८३ च्या 'टीम'ची ( तेव्हा ती 'टीम इंडीया' नव्हती! हा खास गांगूली कर्णधार झाल्यापासून शब्दकोषात आलेला शब्द .. जॅनेट जॅक्सनमुळे 'वॉर्डरोब मालफंक्शन' हा शब्द कसा इंग्लीश भाषेला देणगी म्हणून देण्यात आला अगदी तस्सा!) तुलना २००७ च्या टीमशी करून दाखवतोय.हलत डूलत जाणारी लोकल जशी मध्येच धक्का देउन थांबते तशा थाटात आपल्या रन-अप मध्ये गच्चकन थांबणारा मोहींदर अमरनाथ आज सारख नाक उडवत फिरणा-या श्रीकांतबरोबर टी.व्ही. वर धुमाकूळ घालतोय.गांगुलीच्या कामगिरीतील सातत्याबद्दल गोडवे गाणारा देश तितक्याच कौतूकाने सेहवागच्या योगासनांकडेही लक्ष देतोय (रामदेवबाबा ... सावध असा .. रात्र वै-याची आहे!). द्रवीड सेहवागची वकिली करतोय आणि ग्रेग चॅपेल भाजपच्या 'इंडीया शायनींग' सारखा एकच मंत्र धरून बसलाय. "इंडीया एक्सपेरीमेंटींग"!


भारतासमोरच पहील उद्दीष्ट बांगलादेश आणि बर्मूडा बरोबर जिंकण आहे. कारण श्रीलंका संघ आपल्या देशात येउन कितीही मार खाऊन गेला तरी परक्या मातीवर आपल्याला लोळवण्यात पटाईत आहे. त्यातच बांगलादेशने न्युझीलंडसारख्या संघाला धूळ चारून "आम्हाला कमी लेखू नका" असा इशारा दिलाय!
पण आम्हाला भारतीयांना काही चिंता नाही. खेळलो तरी पैसे, नाही खेळलो तरी पैसे! इंडीया एक्सपेरीमेंटींग !

"बांग्लादेश"ला आपण लोळवूच या पायावर आमचा वर्ल्डकपचा डोलारा उभा आहे. हा पाया भुसभूशीत न निघो म्हणजे मिळवल नाहीतर वर्ल्डकप च्या 'सुपर एट' मध्ये प्रवेश मिळवणे म्हणजे 'मिशन इंपॉसीबल' होवुन बसेल!