Name:
Location: Pune, Maharashtra, India

10.28.2006

aaj baryaach diwasaanni lihaayachaa yog aalaa!

आज माझ्या मराठी अनुदिनीत मी हे इंग्रजी-मराठी काय लिहीत सुटलोय?का 'जमाना बदल रहा है, तुम भी बदलो' या पालुपदाला मी बळी पडलोय?

वर्तमानपत्रात खून, मारामा-या, बलात्कार, राजकारण्यांच्या कोलांट्याउड्या, भारतीय क्रीकेट संघाच्या माजी कर्णधारांनी उधळलेली मुक्ताफ़ळ ( ताज उदाहरण : कपिल देवचे "सचिनने 'वेळेत' निवृत्त व्हावे" हे वाक्य! ) ह्या नेहमीच्या बातम्या सोडून जे काही उरत ते वाचण्यात मला फ़ार रस आहे! त्यामुळे माझ्या अनुदिनीतल्या ब-याचश्या प्रकरणांची सुरुवात 'आजच बातमी वाचली की ...' अशी होत असते.

तर मुळ विषयाला बगल देवुन दुसरच च-हाट लावण ह्या तमाम भारतीयांमध्ये असलेल्या गुणाच प्रदर्शन थांबवून जरा मूळ विषयाकडे वळतो.

आज वर्तमानपत्रात वाचल की आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतले ९०% कलाकार आपले हिंदी संवाद 'रोमन' मधून वाचतात. म्हणजे जस मी पहिल्या दोन ओळीत लिहीलय मराठीच, पण देवनागरी लिपी न वापरता रोमन लिपी वापरलीय तसच! एखाद्या लेखकाने चुकून देवनागरीत लिहीलेले संवाद दिल्यास "हे काय दिलय वाचायला, ईंग्रजी मध्ये आणा" असे सांगितले जाते! एकदा या प्रकाराला वैतागुन कुण्या एका लेखकाने एका प्रथितयश नटाला "तुम्ही स्वप्न कुठल्या भाषेत बघता हो?" असा प्रश्न विचारला व त्याला उत्तर मिळाले "ईंग्रजी"!

हे सगळ वाचून मला माझे बिट्स पिलानी मधले दिवस आठवले. आमचे एक "हिंदी गाण्यांच्या" कॅसेट्सची देवाण-घेवाण करणारे "झंकार" नावाचे मंडळ होते! किती नादमय नाव, कोणाला सुचल असेल बर? आमच्या 'बॅच' च्या काही मुली जेव्हा झंकारच्या काही कार्यक्रमांत सुत्र-संचालन करायला जायच्या तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या संवादाच्या चिठ्ठ्या असायच्या, आणि मला कायम या एकाच गोष्टीच आश्चर्य वाटत आल की या मुली "दर्शकोसे अनुरोध है के वो शांती बनाये रखे" हे लिहायला अत्यंत सोप असलेल आणि त्यांच्या मातृभाषेत असलेल वाक्य सुद्धा ईंग्रजी मध्ये लिहायच्या!

आपल्या देवनागरी सारख्या अत्यंत श्रीमंत लिपीतून ( २६ मुळाक्षरे असलेल्या रोमन पेक्षा देवनागरी कधीही श्रीमंतच! ) लिहिणे लोक बंद करू लागले आहेत याचे कारण काय असेल?

एस.एम.एस. व संगणक संस्कृतीमुळे ईंग्रजी मध्ये 'टाईप' करणे क्रमप्राप्त झाले आहे, आणि मग सगळ्याच मातृभाषेतल्या शब्दांना ईंग्रजीमध्ये पर्यायी शब्द मिळणे कठीण असल्यामुळे ( उदा. लोचा, राडा, शेपूची भाजी ई. ) लोकांनी या शब्दांना रोमन लिपीत तसच्या तसच लिहिण सुरु केल असल्यामुळे हा रोग बळावला असण्याची शक्यता आहे.

आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अर्धशतक होवुन गेल्यानंतरही ईंग्रजांनी "कारकून तयार करणे" या एकमेव उद्देशातून निर्माण केलेल्या शिक्षणपद्धतीला पर्यायी पद्धत अजुन आपण निर्माण करू शकलेलो नाही. त्यातून "ईंग्रजी लिहिणारा-बोलणारा माणूस म्हणजे साहेब" या गैरसमजातून लोक बाहेर यायलाच तयार नाहीत. तिकडे जपान, चीन, फ़्रांस हे देश जगाला 'तुम्हाला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर पहिले आमची भाषा शिका' असे ठणकावुन सांगत असतानाच भारत "आम्ही आमची भाषा-लिपी बासनात गुंडाळून ठेवायला तयार आहोत" अशी भुमिका घेउन उभा आहे व हे निश्चीतच खेदजनक आहे.

आज लोकांच्या तोंडात शुद्ध भाषा येण कठीण झालेल असताना त्यांनी शुद्ध भाषेत लिहाव ही अपेक्षा करण तस चूकच आहे. पण म्हणून केवळ ईंग्रजीच्या सोसापायी आपल्या सहज-सुंदर देवनागरी लिपीची वासलात लावण्यात कुठला शहाणपणा आहे? "फक्त आपणच या अधोगतीकडे जात नाहीयोत, ईंग्रजी पण इतर भाषांमधून किती शब्द उसने घेतेय ते बघ की" असे मला ब-याच लोकांनी ऐकवले आहे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की "चड्डी" हा शब्द ईंग्रजी भाषेत गेल्यावर ते त्या शब्दाला देवनागरीत लिहीत नाहीत, तर त्यांच्याच रोमन भाषेत लिहीतात. पण एकदा वैचारीक गुलामगिरीची सवय झालेल्या लोकांना हे सगळ समजावुन सांगण्याच्या प्रयत्न केला की "गाढवापुढे वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता" ह्या म्हणीची प्रचिती येते!

1 Comments:

Blogger Abhijit Bathe said...

chaangalaa lihitoys. lihit rahaa.

5:35 AM  

Post a Comment

<< Home