Name:
Location: Pune, Maharashtra, India

9.28.2006

आज भारतातर्फ़े या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी "रंग दे बसंती" चित्रपटाची निवड करण्यात आल्याची बातमी वाचली.

साधारण गेल्या २-३ वर्षांपासून ऑस्कर स्पर्धेतील 'सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट' या पुरस्कारासाठी भारतातून पाठविण्यात येणा-या चित्रपटांबद्दल उहापोह व्हायला सुरुवात झाली.

'मदर इंडीया' आणि 'सलाम बॉंबे' या चित्रपटांनंतर अमीर खानच्या 'लगान' ने ऑस्कर पर्यंत जाण्याची ऊंची गाठली. यात विशेष म्हणजे एका 'व्यावसायीक' चित्रपटाने ऑस्कर साठी भारताच प्रतिनिधीत्व करण हा भारतीय सिनेमाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड होता. समांतर सिनेमा व व्यावसायीक सिनेमा यातल अंतर थोड्या प्रमाणात कमी होत असल्याच जाणवल.

तस पाहील तर अमीर खानच्या सदाबहार अभिनयाने नटलेल्या 'लगान'ची मध्यवर्ती संकल्पना 'क्रीकेट' असल्याने, व जगावर फ़ूटबॉलचा व अमेरिकेवर बेसबॉलचा असलेला प्रभाव पाहता हा विषय तिथल्या ज्युरीजच्या कितपत पचनी पडेल हाच मोठा प्रश्न होता. त्यात आपल्या हिंदी चित्रपटातली गाणी हा एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा ठरू शकेल. अमीर खानने सिनेमाच्या जाहीरातीसाठी करोडो रुपये मोजल्याच ऐकल जात. परंतु तिकीटबारीवर विक्रमी ठरलेला हा चित्रपट मानाच ऑस्कर पारितोषीक मिळवु शकला नाही.

त्याच्या पुढच्या वर्षी आपल्या मराठी मातीतला 'श्वास' नामक चित्रपट भारतातर्फ़े ऑस्कर साठी नामांकीत केला गेला. कोकणातल्या एका लहान मुलावर आलेले संकट, त्या मुलावर असलेल्या प्रेमापोटी त्याच्या आजोबांची चाललेली फ़रफ़ट, उपचार करता करता त्या लहान मुलात हळूवारपणे गुंतत जाणारा डॉक्टर असा मानवी भावनांचा गुंता या चित्रपटात सुरेखपणे गुंफ़ण्यात आलेला होता. चित्रपटातल्या एकूण एक कलावंतानी पुर्ण ताकदीनिशी आपापली व्यक्तिरेखा उभी केली होती. किंबहुना ते ती व्यक्तिरेखा जगले होते! परंतु एका मराठी निर्मात्याकडे अमेरिकेत जाउन जाहीराती करण्याएवढे पैसे येणार कुठून? ब-याच चित्रपटप्रेमी मंडळींनी निर्मात्याला मदत केली परंतु माई-बाप महाराष्ट्र शासनानी मात्र मदतीचा हात दिला नाही. आणि कोकण कस आहे, कोकणातल अठरा विश्वे दारीद्र ही काय चीज आहे ही गोष्ट अमेरिकेत बसून ए,सी. गाड्यांमधून फ़िरणा-या ज्युरीजना काय समजणार? यामुळे अतिशय आशयगर्भ असुनही ऑस्कर आणण्याच्या बाबतीत मराठी चित्रपटाचा 'श्वास' कमी पडला.

चालु वर्ष हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने सुगीचे ठरले आहे. अजुन चित्रपट व्यवसायाचा प्राण गणल्या जाणा-या दिवाळी-ईद चा मुहूर्त तर उजाडायचाच आहे. साधारणपणे वर्षाच्या शेवटी येणारे चित्रपट लोकांच्या जास्त लक्षात राहतात आणि सगळ्या पुरस्कार सोहळ्यात बक्षीस मारुन नेतात असा आजवरचा अनुभव असताना या वर्षीच्या पहिल्या 'सुपरहीट' चा मान मिळवणा-या 'रंग दे बसंती' ने या नामांकनाच्या शर्यतीत 'ओंकारा', 'कभी अलविदा ना कहना', 'लगे रहो मुन्नाभाई' अश्या ताज्या चित्रपटांना मागे टाकले ह्यातूनच या चित्रपटातली ताकद दिसून येते! तस पहायला गेल तर 'विदेशी' कलाकार असलेल्या चित्रपटाला नामांकनात झुकते माप मिळते हा आरोप अजुन तरी कोणी केलेला नाही, परंतु ज्युरीजना चित्रपट आपलासा वाटावा या कारणासाठी अश्या चित्रपटाची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही! पण म्हणून 'रंग दे बसंती' मध्ये 'सबस्टंस' नाही असे मात्र नाही! उत्कृष्ट चित्रीकरण, अमीर खानने 'डी.जे.' च्या व्यक्तीरेखेत भरलेले गहिरे रंग, 'सू' ने 'तुम्हारी मा की आंख' हा संवाद टाकत जिंकलेली भारतीय प्रेक्षकांची मने, अतुल कुलकर्णीची जबरदस्त संवादफेक आणि थोडासा 'डार्क' व वस्तुस्थितीला धरून असलेला शेवट ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू!

दरवर्षीची भारतीय चित्रपटांकडे काणाडोळा करण्याची वृत्ती टाकून या वर्षीचे परीक्षक 'बी अ रेबल' हा 'रंग दे बसंती' चा संदेश मनावर घेतात का हे येणारा काळच ठरवील!

'रंग दे बसंती' ला माझ्या शुभेच्छा!

1 Comments:

Blogger Surendra said...

चित्रपट समीक्षक समीर /) ;)

6:20 PM  

Post a Comment

<< Home