Name:
Location: Pune, Maharashtra, India

10.07.2006

जगात कुत्रा या प्राण्याला किती किंमत आहे? आज अचानक असा विचार मनात का प्रकट व्हावा? वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी यावी इतकी किम्मत आहे कुत्र्यांना?नाही नाही ... मला कुत्रा चावलेला नाही! बातमीच तशी आहे!

"मुंबईत पाच लाख भटके कुत्रे असल्याचा प्रशासनाचा दावा!"

वर वर दिसायला बातमी साधीच आहे. पण या बातमीमुळे काय काय होवु शकते याची कधी कल्पना केलीय?

पहिली गोष्ट म्हणजे हा पाच लाख आकडा कितपत खरा मानायचा? सरकार दफ़्तरी प्रत्येक गोष्ट कमी कमी करून सांगतात. म्हणजे पुरात १०० कोटींच नुकसान झाल असेल तर सांगायच १० कोटींचच झालय म्हणून! साहेब प्रत्यक्षात संध्याकाळी ८ ला येणार असले तरी सांगायच दुपारी १ लाच येणारेत म्हणून! (आपण आपले ताटकळणा-या लोकांनी साहेबांना घातलेल्या शिव्यांचे एक छान टीपण तयार करायचे!) त्यामुळे हा पाच लाखाचा आकडा म्हणजे "मतदानात पक्षाच कोणी एक लाख मतांनी हारल तरी हजार मतांचाच फ़रक पडला हो" म्हणण्यातला तर प्रकार नाही ना अशी कुजबूज सध्या सुरु आहे. परंतु दुसरीकडे अशीही आवई उठलीय की 'अधीकृत सुत्रांनी(हे कोण असतात?)' पत्रकार परिषदेत जाहीरपणे हा आकडा योग्य असून हा मुंबईतील 'चतुष्पाद वर्गात मोडणा-या श्वान जमातीचा असून धर्मेंद्र्च्या "कुत्ते-कमीने" मधील "कुत्ते" वर्गात मोडणा-या लोकांचा यात समावेश नाही' असे घोषीत केले आहे.

आतल्या गोटातून (हे कोण असतात?) अशीही एक बातमी कळलीय की विरोधी पक्ष या अहवालातील 'भटक्या' या शब्दावर आक्षेप घेणार असून कुत्र्यांच्या सामाजीक जिवनात विषमता पसरवण्याचा सरकारचा हा कुटील प्रयत्न हाणून पाडण्याचा त्यांचा इरादा आहे! त्यांनी त्यासाठी "कुत्रा तो कुत्रा ... मग तो वर्सोव्यातल्या झोपडपट्टीतला असो वा मलबार हीलवरचा!" , "'भटके' म्हणून अवहेलना करण्यात आलेल्या कुत्र्यांना त्यांचा न्याय्य हक्क ( म्हणजे एक मालक ) मिळालाच पाहिजे!" अश्या आशयाचे कापडी फ़लक तयार करण्याची 'ऑर्डर' दिल्याची कुणकूण आहे.

'कम्युनीस्टांनी' ( हे कोण असतात? ;-) )तर या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलय! त्यांच्या मते कुत्र्यांच्या या भरमसाठ लोकसंख्यमागे बहुराष्ट्रीय औषध विक्रेत्या कंपन्यांचा हात असून आपली 'रॅबीज' रोगावरील औषधे विकली जावीत म्हणून ते हे कुत्रे वापरतात. त्यामुळे कुठल्याही कुत्र्यानी वा कुत्रा चावलेल्या इसमानी या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पुरवलेली औषधे घेउ नयेत असे जाहीर आवाहन त्यांच्यामार्फ़त करण्यात आले आहे!

तिकडे मनेका गांधी ने सरकारने जाहीर केलेले आकडे ऐकून समाधान व्यक्त केले आहे. कुत्रे हे मानवाचे मित्र असून 'लहान मुले चावल्यावर तुम्ही त्यांचे गालगुच्चे घेउन "पॉलत नाही न कॉरनार अश? शहानी पोग्गी आहे की नाही माझी शोनुली?" अस म्हणता न? मग कुत्रा चावल्यावरच त्रागा का करता?' असा जाहीर सवाल केलाय! कुत्र्यांना बदनाम करणा-या हिंदी चित्रपटांविरुद्ध कारवाईची मागणी त्या करणार असल्याचे समजले.

सध्या गांधीगिरीचे फ़ॅड जरा वाढलेले असल्याने महाराष्ट्र सरकारला सादर करण्यात आलेला एक महत्वाचा व्यापार विषयक अहवाल गांधीजींच्या तसबिरीमागे दडवून ठेवण्यात आलेला असल्याचे नुकतेच 'ऑपरेशन भू-भू' चे प्रणेते श्री. मांजरमारे यांनी जाहीर केले. त्या अहवालात एवढे महत्वाचे काय होते असे विचारले असता 'मुंबईतील कुत्र्यांना नागालॅंड मध्ये निर्यात करण्याचा ठराव त्यात मांडण्यात आला होता" असेही कळले.

परवा माझ्या एका 'कुत्रा गाडीसमोर येउन मोटारसायकलस्वाराला अपघात, स्वाराचे पुढचे दोन दात तुटले!' या बातमीमुळे वर्तमानपत्रात चमकलेल्या माझ्या मोटारसायकलस्वार मित्राला ही पाच लाख कुत्र्यांची बातमी दाखवली. आणि काल संध्याकाळी तो मला मुंबईला जाणा-या इंद्रायणी एक्स्प्रेस मध्ये भेटला. पहिले "सहजच .. जरा काम आहे" असे सांगुन मला टाळल्यावर शेवटी अधीक खोदून खोदून विचारले असता त्याने "वैयक्तीक आकसापोटी कुत्र्यांवर विषप्रयोग करायला" जात असल्याचे कबूल केले!

मी त्या मित्राला शुभेच्छा देतानाच ठरवून टाकलय, उद्या या प्रयत्नांत रॅबीज होवून माझा मित्र 'शहीद' झाला तर मी धर्मेंद्रला त्याच्या घरी जाउन सांगेन, 'कुत्ते ... चून चून के मारुंगा ... चून चून के ..." हे तुझ वाक्य माझा मित्र अक्षरश: जगला होता म्हणून....

0 Comments:

Post a Comment

<< Home