Name:
Location: Pune, Maharashtra, India

7.18.2006

त्याच काम आटोपून तो नेहमीच्या ७५ नंबरच्या पी.एम.टी. बसने आपल्या घरी जायला निघाला.पण आज घरी जाताना मनात एक भिती होती. अजुन तरी खडकवासला धरणातून पाणी सोडणार अशी पुर्वसुचना मिळाली नव्हती, पण ती कुठल्याही क्षणी जाहीर होण्याचा धोका होता.

त्याची झोपडी नदीच्या काठापासून साधारण २५ ते ३० फूटांवर होती. दरवर्षी पावसाळ्यात एकदा तरी नदीला पूर येइ व पाणी ओसरेपर्यंत त्याच्या जीवात जीव नसे. आणि या वर्षी तर जणू आभाळच फ़ाटले होते! रोज पाऊस वेड्यासारखा कोसळत होता.दररोज वाढणारी पाण्याची पातळी उरात धडकी भरवत होती.
अपार कष्ट करून त्याने त्या छोट्याश्या झोपडीत एक छोटस घरकूल सजवल होत. थोड्याफ़ार सुखसोई तयार केल्या होत्या. एक महिन्याने बोहल्यावर चढायच्या नुसत्या विचारानेच त्याला गुदगुल्या झाल्यासारखे व्हायचे!

आपल्याच विचारांच्या तंद्रीत असतानाच रेडीओ मिर्चीवर चालु असलेल्या कार्यक्रमातला एका प्रथितयश अभिनेत्रीचा आवाज त्याच्या कानावर पडला. "पुण्यात पावसाळ्यात किती मज्जा येते नाही! आणि आपण सगळे कसे पुराची मजा बघायला पुलावर जाउन उभे राहतो! आय लव्ह पुणे!"
"मजा! पुराची मजा!! अहो बाई, तुमची मजा होते पण आमचा जीव जातो हो ..." त्याने मनात विचार केला ...

तो घराजवळ पोचेस्तोवर पावसाचा जोर बराच वाढला होता. तो बसमधून खाली उतरुन आपल्या झोपडीच्या दिशेने जाउ लागला. त्याच्यात आणि झोपडीच्या मध्ये जेमतेम २०० मीटर लांबीच्य एका पुलाचे काय ते अंतर होते.

"आज पुलावर नेहमीपेक्षा जास्तच वर्दळ दिसतेय. ती पण अश्या पावसापाण्याची...कमालच आहे!" हा विचार करत त्याने स्वत:च्या झोपडीकडे नजर फ़ेकली आणि त्याला धक्काच बसला. नदी दुथडी भरून वाहत होती आणि त्याची अर्धी झोपडी पाण्याखाली गेली होती.

तो धावत पळत झोपडीपर्यंत येउन पोचला. नगरपालिकेची एक गाडी नुकतीच परिस्थीतीचा आढावा घेउन तेथे राहणा-या लोकांच्या मदतीसाठी एक ट्रक आणावयास गेली होती. सगळे लोक आपापल्या घरातील महत्वाचे सामान गोळा करण्यात गुंतले होते. त्यानेही मग पगाराच्या दिवशी घेतलेला नवीन ब्लॅक ऍंड व्हाईट टी.व्ही. उचलला व तो एखाद्या सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यासाठी निघाला.

तेवढ्यात कोणीतरी "ट्रक आला रे!" असे ओरडले व तो टी.व्ही. पोटाशी धरून त्या पुलाच्या दिशेनी वेड्या-सारखा धावत सुटला. धावता धावता "ट्रकवाल्यांना जास्त मस्ती चढलीय हल्ली ... गाडी पुलावरून या बाजुला आणायला काय होतय हरामखोरांना ..." हा विचार त्याच्या मनात घोळत होता.
तो पुलावर पोचला, त्याने एकवार त्या ट्रकवाल्याला ओरडून शिव्या देण्यासाठी तिकडे पाहिले मात्र आणि तो जागच्या जागीच थिजला.

पुलाच्या दुस-या टोकावर असलेला ट्रक पुलाच्या तोंडाशी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्यांकडे पाहून जोरजोरात हॉर्न वाजवत होता... पुलावर लोक देहभान विसरून "पुराची मजा" बघत दाटीवाटीने उभे होते... वरुन पाऊस कोसळतच होता ...

आणि तो ... तो भकास नजरेनी त्या चारचाकी गाड्यांचा मालक या गर्दीत नेमका कुठे असेल याचा विचार करत, वसण्यापुर्वीच उधळला गेलेला आपला संसार बघत उभा राहीला...

0 Comments:

Post a Comment

<< Home