anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

7.31.2006

समजा एखाद्या वेळी तुम्ही गावच्या जत्रेत मित्रांच्या घोळक्यात उनाडक्या करत फ़िरत असतान एक अनोळखी काकू अचानक तुमच्यापुढे येउन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या "बेटा, आमची कार पंक्चर झालीय. घरी फोन करायचाय. जरा मोबाईल देतोस?" तर तुम्ही काय कराल?

बरोब्बर! तुम्ही प्रथम हळूच हातातल्या घड्याळाकडे बघाल. मग आजूबाजूला खरच कुठे एखादी पंक्चर कार दिसतेय का ह्याचा अंदाज घ्याल. "यावेळी या भागात 'कॉईन बॉक्स' चालू नसतील का?" ह्या प्रश्नाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल.पण तेवढ्यात तुमची नजर त्या कारमधून बाहेर पडणा-या गरोदर बाईवर पडेल.त्या दोन्ही बायकांच्या चेह-यावरून "त्या एकंदरीत घरंदाज व संकटात सापडलेल्या अबला आहेत" असा विचार मनात पक्का करुन तुम्ही खिशातून तुमचा मोबाईल काढाल व त्या काकुंच्या हवाली कराल.

काकू फोनवर कुठलाही पुणेरी-पणा न दाखवता सुजाण नागरिका-सारख फक्त कामाच तेवढच बोलतील. "कार पंक्चर झालीय.नवी पाठवा" येवढे बोलून काकु फोन तुमच्या हातात देतील. वरुन तोंड भरून आशिर्वाद मिळतील. आणि तुम्हीसुद्धा एका गरजूला मदत केल्याच मानसिक समाधान मिळवून मित्रमंडळीत गुंग व्हाल!

दुस-या दिवशी सकाळी गावातल्या प्रमूख बाजारपेठेत २ प्रचंड मोठे बॉंबस्फोट होतील. हजारो लोक म्रुत्यूमुखी पडतील. गुप्तचर यंत्रणांची तपासचक्र वेगानी फ़िरु लागतील.

स्फोटाच्या दुस-या दिवशी "अतिरेक्यांची स्फोटाच्या आदल्या रात्री गावच्या जत्रेत एक असाच स्फोट घडवून आणण्याची योजना फ़सली होती" असे पोलीस जाहीर करतील. "आपला जीव थोडक्यात वाचला" या विचाराने तुम्ही सुखी व्हाल ... पण काही क्षणच ...

"कार पंक्चर झालीय. नवीन पाठवा." या सांकेतीक शब्दांत अतिरेक्यांनी जत्रेतला स्फोटाचा प्रयत्न फ़सल्याचे त्यांच्या म्होरक्याला कळविले असे प्रत्येक पेपरात छापून येइल.

ते वाचत तुम्ही काराग्रुहात; त्या गरोदर बाईचे चित्र डोळ्यासमोर आणत, तिच्या पोटात खरच एक निष्पाप जीव होता का हजारो निष्पापांचा जीव घेण्यासाठी बांधलेला बॉंब होता यावर विचार करत, हे असले जीवन जगण्यापेक्षा ती कार पंक्चर झाली नसती व तो बॉंब तिथेच फूटून आपला जीव गेला असता तर छान झाले असते असे स्वत:ला म्हणत तळमळत बसलेले असाल.

तेव्हा शक्यतो आपला मोबाईल अनोळखी व्यक्तीला वापरायला देउ नका.

काय म्हणालात? हे सगळ सांगणारा मी कोण?

मागचा मनुष्याला शहाणा करण्यासाठी आधी पुढच्यास ठेच खावी लागते.
आपल्या सर्वांच्या जीवन-म्रुत्युच्या या प्रवासातला तुमच्या पुढे चालणारा सहप्रवासी समजा मला हव तर ...
ठेचकाळलेला ...

7.18.2006

त्याच काम आटोपून तो नेहमीच्या ७५ नंबरच्या पी.एम.टी. बसने आपल्या घरी जायला निघाला.पण आज घरी जाताना मनात एक भिती होती. अजुन तरी खडकवासला धरणातून पाणी सोडणार अशी पुर्वसुचना मिळाली नव्हती, पण ती कुठल्याही क्षणी जाहीर होण्याचा धोका होता.

त्याची झोपडी नदीच्या काठापासून साधारण २५ ते ३० फूटांवर होती. दरवर्षी पावसाळ्यात एकदा तरी नदीला पूर येइ व पाणी ओसरेपर्यंत त्याच्या जीवात जीव नसे. आणि या वर्षी तर जणू आभाळच फ़ाटले होते! रोज पाऊस वेड्यासारखा कोसळत होता.दररोज वाढणारी पाण्याची पातळी उरात धडकी भरवत होती.
अपार कष्ट करून त्याने त्या छोट्याश्या झोपडीत एक छोटस घरकूल सजवल होत. थोड्याफ़ार सुखसोई तयार केल्या होत्या. एक महिन्याने बोहल्यावर चढायच्या नुसत्या विचारानेच त्याला गुदगुल्या झाल्यासारखे व्हायचे!

आपल्याच विचारांच्या तंद्रीत असतानाच रेडीओ मिर्चीवर चालु असलेल्या कार्यक्रमातला एका प्रथितयश अभिनेत्रीचा आवाज त्याच्या कानावर पडला. "पुण्यात पावसाळ्यात किती मज्जा येते नाही! आणि आपण सगळे कसे पुराची मजा बघायला पुलावर जाउन उभे राहतो! आय लव्ह पुणे!"
"मजा! पुराची मजा!! अहो बाई, तुमची मजा होते पण आमचा जीव जातो हो ..." त्याने मनात विचार केला ...

तो घराजवळ पोचेस्तोवर पावसाचा जोर बराच वाढला होता. तो बसमधून खाली उतरुन आपल्या झोपडीच्या दिशेने जाउ लागला. त्याच्यात आणि झोपडीच्या मध्ये जेमतेम २०० मीटर लांबीच्य एका पुलाचे काय ते अंतर होते.

"आज पुलावर नेहमीपेक्षा जास्तच वर्दळ दिसतेय. ती पण अश्या पावसापाण्याची...कमालच आहे!" हा विचार करत त्याने स्वत:च्या झोपडीकडे नजर फ़ेकली आणि त्याला धक्काच बसला. नदी दुथडी भरून वाहत होती आणि त्याची अर्धी झोपडी पाण्याखाली गेली होती.

तो धावत पळत झोपडीपर्यंत येउन पोचला. नगरपालिकेची एक गाडी नुकतीच परिस्थीतीचा आढावा घेउन तेथे राहणा-या लोकांच्या मदतीसाठी एक ट्रक आणावयास गेली होती. सगळे लोक आपापल्या घरातील महत्वाचे सामान गोळा करण्यात गुंतले होते. त्यानेही मग पगाराच्या दिवशी घेतलेला नवीन ब्लॅक ऍंड व्हाईट टी.व्ही. उचलला व तो एखाद्या सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यासाठी निघाला.

तेवढ्यात कोणीतरी "ट्रक आला रे!" असे ओरडले व तो टी.व्ही. पोटाशी धरून त्या पुलाच्या दिशेनी वेड्या-सारखा धावत सुटला. धावता धावता "ट्रकवाल्यांना जास्त मस्ती चढलीय हल्ली ... गाडी पुलावरून या बाजुला आणायला काय होतय हरामखोरांना ..." हा विचार त्याच्या मनात घोळत होता.
तो पुलावर पोचला, त्याने एकवार त्या ट्रकवाल्याला ओरडून शिव्या देण्यासाठी तिकडे पाहिले मात्र आणि तो जागच्या जागीच थिजला.

पुलाच्या दुस-या टोकावर असलेला ट्रक पुलाच्या तोंडाशी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्यांकडे पाहून जोरजोरात हॉर्न वाजवत होता... पुलावर लोक देहभान विसरून "पुराची मजा" बघत दाटीवाटीने उभे होते... वरुन पाऊस कोसळतच होता ...

आणि तो ... तो भकास नजरेनी त्या चारचाकी गाड्यांचा मालक या गर्दीत नेमका कुठे असेल याचा विचार करत, वसण्यापुर्वीच उधळला गेलेला आपला संसार बघत उभा राहीला...

7.12.2006