anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

6.28.2006

आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ...
जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात ..
त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हे सदर ....

याची कानी ... याची डोळा ...


प्रसंग एका क्ष-किरण तपासणीग्रुहातला ... ( एक्स-रे क्लिनीक )
मी दारात पाउल टाकले त्या क्षणापासून आत्तापर्यंत समोरच्या 'रिसेप्सनिष्ट' ने तो बाबा आदमच्या काळातला दिसणारा संगणकाचा डब्बा सुरु करण्याचे आठ 'अयशस्वी प्रयत्न' पुरे केले आहेत ..
संगणक सुरु करण्याची तिची पद्धत दर खेपेला बदलतेय...

पहिल्या दोन प्रयत्नांत महाराष्ट्राचे भुषण म्हणून ओळखल्या गेलेल्या एम.एस.ई.बी.ने
( एम.एस.ई.बी. = मनडे-टू सनडे ईलेक्ट्रीसिटी बन्द ) दिलेल्या विजेचे बटण सुरु करणे, संगणकाचे बटण दाबणे व 'मॉनीटर' वर बघणे ह्या साधारण क्रिया ...
पुढच्या दोन प्रयत्नांत सी.पी.यु. गदा-गदा हलविणे या क्रियेचा समावेश ...
पुढील तीन प्रयत्नांत 'की-बोर्ड' वर घणाचे घाव घालणे या क्रियेचा समावेश ..
मला "घणाचे घाव" काय असतात याचे प्रात्यक्षीक दाखविण्याचा तिचा प्रयत्न स्तुत्य!
शेवटच्या आठव्या प्रयत्नात ती मॉनीटर च्या डोक्यावर टपली मारते... अख्खे टेबल हादरते ...
पण तरिही संगणक सुरु झालेला दिसत नाही ...
कारण ती पुन्हा नवव्या प्रयत्ना साठी कंबर कसून तयार! ( चिकाटी आहे हो पोरीत! नाव काढेल ...)

नववा प्रयत्न सुरु ...
तेवढ्यात तिची दुसरी मैत्रीण तिथे येते ...
बहुदा हिच्याहून जास्त अनुभवी दिसतेय ...
या वेळी संगणकाच्या डोक्यावर टपली, की-बोर्ड ला शाबासकी, सी.पी.यु.चे कौतूक ...
सर्व प्रकार करुन होतात ...
आणि तेव्हाच हे सगळे प्रकार पाहुन नाक मुरडत ती अनुभवी मुलगी स्वत: बिल गेट्स असल्याच्या थाटात सल्ला देते ...

"अग घाई नको करुस ... पहिले गरम तर होवु दे कॉंप्युटर ला ..."
( हा सल्ला ऐकुन आम्ही गार .. सांगणे न लगे! ;-) )

6.22.2006

काल रात्री दोन वाजता एस.एम.एस. आल्याची घंटा वाजली. ( घंटा बडवल्यासारखा 'रिंगटोन' लावायची खाज .. बाकी काय! )उठून मेसेज वाचला आणि कपाळावर हात मारुन घेतला!

सौम्य पॉलचा 'मेसेज' होत."आय ऍम युजींग युअर टूथपेस्ट"

मनात म्हंटल 'च्यायला वापरली तर वापरली आणि वर बाजुच्या खोलीत राहत असुन मला एस.एम.एस. करतोय ??'
मनात विचार आला एक हाक मारावी जोरात 'इतनी रात मे एस.एम.एस क्या कर रहा है बे झंडू?'

पण त्याच क्षणी जाणवल ... आपण किती एकटे आहोत ते ... आणि क्रुतघ्न देखील ...

३ वर्ष मी आणि सौम्य आमच्या कॉलेज मध्ये शेजार-शेजारच्या खोल्यांमध्ये राहीलो आहोत ...
एकमेकांच्या सुखा-दु:खाच्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत ...
घरापासून १५०० किमी दूर राहुनही सौम्य, सुम्या, ओजस, माल्या यांच्या सहवासात कधी एकट एकट वाटल नाही ...पण आज हा मेसेज वाचुन खरच फ़ार एकट एकट वाटतय ...

सौम्यनी काय म्हणून केला असेल हा मेसेज मला?
प्रतिक्षीप्त क्रिया?
दर दोन मिनिटानी एकमेकांशी बोलायची लागलेली सवय?
का रात्री अडीच ला अचानक आलेली कॉलेजच्या सोनेरी दिवसांची आठवण?
का अगदी चुकून?

आमच्या बहिणाबाई म्हणतात, "दादा मला तर हल्ली वाटायला लागलय मैत्री म्हणजे काय तर नुसत एकत्र असताना हा-हा ही-ही करण ..बास ... एकदा का शाळा-कॉलेज वेगळी झाली, की तु कोण आणि मी कोण?"

खरच इतक साध आणि तकलादू आहे हे नात?
फक्त मेसेंजर वर महिन्यातून एखाद वेळेला 'कसा आहेस? काय चाललय?' विचारण्या एवढ औपचारीक?
का आपण ते तस बनवतोय?
का कोषात गुरफ़टून घेताहेत लोक स्वत:ला एखाद्या सुरवंटासारख?

मैत्री टिकवायची असेल तर भेटीगाठी घडत राहिल्या पाहिजेत ...
आणि त्या घडत नसतील तर मुद्दाम घडवून आणल्या पाहिजेत ...
विचार-मंथन चालु असतानाच सौम्यचा ५ मिनिटात दुसरा 'मेसेज' आला ...
'सॉरी दॅट वॉज फ़ॉर समवन एल्स...'

पण दुस-या कोणासाठी तरी असलेल्या त्या मेसेज नी मात्र मला योग्य धडा दिलाय ...
मैत्री टिकवण्याचा ... निभावण्याचा ...

6.18.2006

"जवानी मे ऐसी गलतिया होती ही है" हे भा.ज.पा.चे बुजुर्ग नेते श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचे वाक्य ऐकून आश्चर्य वाटले नाही. विशेषत: त्यांचे निकटवर्ती सहकारी श्री. लालक्रुष्ण अडवाणी यान्नी पाकिस्तानात जाउन इतिहासाला जे नवे पैलु पाडले होते ते बघता हे अपेक्षीतच होते!

बीड जिल्ह्यात ४४ स्वातंत्र्यसैनीक चाळीशीचे आहेत हे व्रुत्त वाचले. धन्य ते 'अजुनही भुत-काळात जगणारे व काळालाही आपली गती विसरायला लावणारे हे स्वातंत्र्यसैनीक' व धन्य ते अशा 'दुर्मीळ मनुष्य-जातीचा शोध लावणारे शासकीय अधिकारी'!

पद्मश्री सानिया मिर्झा फ़्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फ़ेरीत बाहेर पडली.काय करणार बिचारी! ड्रॉ अवघड आला! पण एक बरे झाले, पहिल्याच फ़ेरीत हारल्यामुळे पुढचे २-३ दिवस तरी तिला मोकळे मिळाले. फ़्रान्स मधील जाहीरात कंपन्यांशी बोलणी करायला २-३ दिवस पुरे होतील नाही का?

निवड समिती हरभजन सिंग ला मामा बनवतेय!समोरचा फ़लंदाज कुट कूट कूटत असतानाही निवड समिती त्याच्यातल्या जागतीक दर्जाच्या ऑफ़स्पिनर वर अन्याय न करता त्याला खेळवते! मग भलेही त्याने एकही बळी न मिळवता ९० षटके टाकली असोत!! पण त्याने सुरेख गोलंदाजी केली असताना, पिचवर सेहवाग हात-हात भर व कुंबळे करंगळीच्या नखाएवढा बॉल वळवत असताना (!!!) भज्जीचे काम पाणी भरणे हा कुठला न्याय?

जाता जाता श्री परेश रावळ यान्ना एक नम्र विनंती..
क्रुपया आपण आता डोळ्यावर वेंधळा चष्मा लावून बावळटाच सोंग घेण बास करा. तुमच्या एकसुरी अभिनयाने तुमचा 'भरत जाधव' होण्याची वेळ आली आहे. हल्ली लोक तुम्हाला परेश रावळ या नावानी न ओळखता 'बाबूराव' नावानी ओळखतात हा तुमच्यातल्या कलाकाराचा विजय असला तरी तुम्ही गुलशन ग्रोवर व्हायचे की नसिरुद्दीन शहा हे ठरवण्याची वेळ आलेली आहे!
--आपला एक शुभचिंतक

6.14.2006

भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय पुन्हा दूर पळणार नाही ना पावसामुळे?
अंगात ताप असल्यामुळे घरातून कुठेच बाहेर पडू शकत नाहीये मी ...

त्यात माझ्या घरातील आवाजाचा एकमेव स्त्रोत ( हो, मी अजुन तरी स्वत:शी बोलत नाही ... ) असलेला रेडीओ ह्या पावसाच्या अवेळी प्रकट होण्याच्या बातम्या देतोय!

हात, पाय, मान, घसा, कंबर, पाठ, डोक ई. दुखत असतानाच ज्याच्याकडे विरंगुळा म्हणून बघाव त्या गोष्टीनी असा दगा द्यावा हे काही बरोबर नाही ...

तेवढ्यात माझ्या मनात विचार येतो "आज माझ्याकडे माझ्या बहिणीने बळकावलेला 'कॉंप्युटर' असता तर किती छान झाल असत ... निदान गाणी तरी ऐकली असती ..."

आणि लगेच रेडिओवर "आजचा सामना पावसामुळे वेळेवर सुरु होवु शकणार नाही ... पुढील बातमी हाती येइपर्यंत ऐकुयात हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ..." असा अस्पष्ट आवाज ऐकु येतो ...

आणि मग सुरु होते हिंदी चित्रपट संगिताची लयलूट ...

ये हरियाली और ये रास्ता ...

इम्तेहा ए ईश्क मे हम सारी रात जागे ...

तु गंगा की मौज मे जमना किनारा ...

मधुबन मे राधिका नाचे रे ...

एकापेक्षा एक मधुर गाणी ऐकुन हा हा म्हणता माझा ताप उतरतो ...
अहो आश्चर्यम!
हे स्वप्न का वास्तव?
माझा मेंदू विचार करु लागतो ... मी कल्पव्रुक्षा खाली तर नाही ना बसलेलो मनात आलेली इच्छा पूर्ण व्हायला?

मनाचा एक कोपरा मात्र मला ओरडून ओरडून सांगतोय ... जास्त विचार करु नकोस ... पस्तावशील ... जे ऐकायला मिळतय ते ऐक आणि स्वस्थ पडून रहा ...

पण शेवटी कुतुहूलमुळे मनाला काही केल्या धीर धरवत नाही ... आणि तो दुष्ट अमंगळ विचार मनात आकाशात चमकणा-या विजेसारखा एक क्षणभर आपले अस्तित्व दाखवून जातो ...

आणि ...

रेडिओ अचानक 'एखाद्याच्या पार्श्वभागावर चिमटा काढल्यावर जशा आवाजात ओरडतात' तशा आवाजात किंचाळू लागतो ...

हो ... मी तोच विचार केलेला असतो ...

"एवढी गाणी झाली पण अजुन हिमेश रेशमियाची कोल्हेकूई कशी नाही ऐकु आली?"
मी अंगातली सर्व चेतना हरवलेल्या एखाद्या प्रेता सारखा पडून राहतो ...

आणि बाजुला कोल्हेकूइ तशीच चालु राहते ... "ओ हुजू.....................र "

6.07.2006

पुणे शहर ...
दिनांक ६ जून २००६ ...
संध्याकाळी ८ ची वेळ ...
मी निघालोय ऑफ़ीसातून घरी जायला ...
आज नशीब जोरावर आहे अस दिसतय ...
ऑफ़ीसातला मित्र पुणे इंजीनिअरींगच्या चौकात सोडतो म्हणाला ...
रेंज हील हून रेलवे रुळाखालून येणारा रस्ता जुन्या पुणे-मुंबई हाय-वे ला जिथे मिळतो त्या चौकात मला कधी नव्हे तो वाहतुक-पोलीस दिसला ...
या चौकात पोलीस दिसणे हे धुमकेतू दिसण्याप्रमाणे आहे ... अपशकूनी ...!!
या धक्क्यातून मी सावरे-पर्यंत गाडी उजवीकडे वाकडेवाडीकडे जाण्यास वळली होती ...
पुढे दर १०० पावलाच्या अंतरावर गडद भगव्या रंगाची जाकीटे घातलेले पोलीस दिसु लागले ...
शॉपर्स स्टॉप वर आलो आणि सहज रस्त्याच्या उजव्या बाजुला नजर टाकली आणि ब-याच वेळापासुन मनात "काहितरी चुकतय" हा जो विचार चालु होता तो एका क्षणात थांबला...
रस्त्याच्या उजव्या बाजुने जाणारे एकही वाहन दिसत नव्हते ...
एरवी रस्त्याच्या मध्याभागी उड्या मारत खेळणारी झोपडपट्टीतली मुलही तिथे नव्हती ...
फ़ेरीवाले दिसत नव्हते , देशी दारुच्या दुकानावर तोबा गर्दी सुद्धा नव्हती ...
मग मात्र मी काय ते समजलो ...
गाडीतून पुढे नजर टाकताच दिसली हनुमानाच्या शेपटी सारखी पसरलेली वाहनांची भली मोठी रांग ... आता येथेच उतरून म.न.पा. ला जाण्यातच शहाणपणा आहे असे समजून मी संगमवाडी ला जाणा-या व तोंडावरच झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाल्याने दयनीय दिसणा-या पुलाच्या थोड पुढे उतरून रस्ता पार केला ..
पुण्यात रस्ता पार करणे एवढे सोपे कधी होते का?बिनविरोध रस्ता पार करायला मिळतोय म्हंटल्यावर मनात एकदा "रांगत रांगत" रस्ता पार करण्याचा निर्माण झाला मोह कसाबसा टाळून मी रस्ता पार केला...

थोड समोर येउन उजवीकडे संचेतीच्या पूलावर चढत असताना बघतो तर तिथे पण अशीच मोठी रांग ...
ती पण संचेती हॉस्पीटलच्या समोर असलेल्या चौकापासून, पुल चढून पुलाच्या दुस-या टोकापर्यन्त पसरलेली!
मी आपला हळूहळू पूल चढत बरोबर पुलाच्या मध्यभागी येउन उभा राहीलो.
"बिचा-या पी.एम.टी. च्या गाड्या कश्या चढणार हो तो पूल शुन्य गती वरुन? काही बसेस मागे घसरु लागल्या उतारावर तर काय होइल हो?" असले खतरनाक विचार ही माझ्या मनात येउन गेले!
पण हा सर्व प्रकार काय आहे हे मात्र काही केल्या उमजत नव्हते ...

तेवढ्यात समोर पोलिसांची धांदल उडाली आणि मला या सर्व खटाटोपामागचा कार्यकारण भाव कळला ...
माझ्या उजव्या हाताला असलेल्या सी.ओ.ई.पी. कडून एक लाल दिव्याची गाडी आस्ते आस्ते वाकडेवाडीच्या दिशेनी रांगत होती ...

आणि त्याच क्षणी पुलावर उभ्या असलेल्या माझी द्रुष्टी पुलाच्या दुस-या बाजुकडील चौकाकडे वळली ...
तिथेही चौकाच्या मध्यभागी एक लाल दिव्याची गाडी उभी होती ...

चौकातून समोरच्या पुलावर चढलेली वाहनांची रांग कधी एकदा पुढे सरकतेय आणि ५ फ़ूट मोकळी जागा मिळून मी कधी एकदा समोरच्या संचेती हॉस्पीटल मध्ये जातेय याची केविलवाण्या नजरेनी वाट पाहत थांबलेली रुग्ण-वाहीका ...