Name:
Location: Pune, Maharashtra, India

10.11.2006

भारतातील संसद भवनावर हल्ला करणा-या व या गुन्ह्यात दोषी ठरून फाशीची शिक्षा झालेल्या मोहंमद अफ़जल बद्दल विविध राजकीय पुढा-यांना, विचारवंतांना आणि मानवी हक्क संघटनांना अचानक पुळका आलाय. त्यांनी उधळलेली काही मुक्ताफळे ...

रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी अफजलला फ़ाशी दिल्यास राज्यातील नागरिकांना चुकीचा संदेश दिला जाईल.
-गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर

महात्मा गांधींच्या या भूमीत मानवतावादी दृष्टीकोनातून अनेक निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवुन सरकारने फ़ाशीचा निर्णय पुढे ढकलावा
-मेहबुबा मुफ़्ती, पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या अध्यक्षा

भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या शांतिदुतांच्या देशात फ़ाशीची शिक्षा असावी का, यावर समग्र चर्चा घडवून यायला हवी. महंमद अफ़जल याला फ़ाशीऐवजी जन्मठेपच देण्यात यावी.
-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर

अफजलला फ़ाशी देउन त्याला धर्मांधांच्या नजरेत हुतात्मा होवु देउ नका. त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल त्याला तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत खितपत पडू द्या. मुलांना शिकवण्याचे सकारात्मक काम त्याला द्या आणि सकाळ संध्याकाळ त्याला स्वच्छतागृह साफ़ करायला लावा.
-खुशवंतसिंग

देशाच्या संसदेवर हल्ला करणा-या गुन्हेगारा बद्दल जर लोक सहानुभुती ठेवत असतील तर या देशातील लोकांएवढे मोठे षंढ अख्ख्या ब्रम्हांडात शोधूनही सापडणार नाहीत. कुठल्या प्रश्नाचे राजकारण करावे व कुठल्याचे करु नये हे ही न समजण्याएवढे बाळबोध पक्ष व त्यांचे पक्षश्रेष्ठी या देशात असतील, तर इथल्या लोकशाही एवढा फ़ार्स अख्ख्या जगात कुठेही शोधून सापडणार नाही.

जेव्हा संसदेसारख्या अतिमहत्वपुर्ण वास्तूवर हल्ला होतो, तेव्हा तो हल्ला एखाद्या वास्तुवर वा व्यक्तीवर नव्हे तर त्या देशाच्या अस्मितेवर झालेला हल्ला असतो. अश्यावेळी मतांच्या भिकेकडे लक्ष न घालता न्यायव्यवस्थेच्या मदतीने संबंधीत अपराध्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा देणे हा सरकारचा एकमेव उद्देश असला पाहिजे.

आधीच डोळ्याला काळी पट्टी बांधून हातात न्यायदानाचा तराजू घेतलेल्या न्यायदेवतेकडून कठोर शिक्षा मिळणे हे एक कठीण काम होवून बसले आहे. कायद्यात वाटांपेक्षा पळवाटाच जास्त आहेत. त्यातूनही जर एखाद्याला फ़ाशीसारखी कठोर शिक्षा झालीच, तर मानवी हक्क संघटना आणि राजकीय स्वार्थ साधणा-या व्यक्ती त्या निर्णयावर हरकत घेतात. त्यापुर्वी आपण ज्याचा बचाव करत आहोत ती व्यक्ती जगण्याच्या लायक तरी आहे का हा विचार ते करत नसावेत असे वाटते. मग एका अजाण बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करणारी 'धनंजय' नावाची दुष्टप्रवृत्ती असो वा अजाण निष्पाप बालकांचा बळी देणा-या 'गावित भगिनी' असोत वा देशाच्या संसदेवर बॉंबहल्ला करून अनेक सुरक्षा रक्षकांचा हल्ला करणारा अफजल सारखा अतिरेकी असो, या स्वार्थलोलुप व्यक्तींना त्याबद्दल काहीच नसते.

महात्मा गांधींची शिकवणूक आठवणा-या याच लोकांना गांधीजींचा 'सत्य-आग्रह' हा विचार तरी माहिती आहे का हे विचारण्याची वेळ आलेली आहे. ह्या प्रसंगी शांततेचा आग्रह धरणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणेच होय. तुम्ही कितीही हैदोस घाला, कितीही लोकांचे जीव घ्या, ह्या देशात तुम्हाला होवु शकणारी मोठ्यात मोठी शिक्षा म्हणजे 'लहान मुलांना शिकवणे!'. जो मनुष्य बॉंबहल्ले करतो तो लहान मुलांना महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महावीर यांचे विचार शिकवेल व समाजात सलोखा निर्माण करेल असे खुशवंतसिंगांना वाटत असेल तर त्यांना दिवा-स्वप्न पाहण्याची सवय लागली असावी असे दिसते. या कैद्यांना तुरुंगात ठेवल्यानंतर ते तिथे खितपत रहात नाहीत. त्यांचे साथीदार आपल्या देशाची विमाने अपहृत करून त्यातील लोकांच्या जीवाच्या बदल्यात ह्या साथीदारांना सोडवून घेउन जातात हे कंदाहार विमान अपहरणाच्या वेळी आपण अनुभवलेच आहे. या उप्परही आपण शहाणे होणार नसू तर मरेपर्यंत सापाला साप न म्हणता दोरीच म्हणणा-या मुर्खासारखी आपली अवस्था होइल.

संसदेच्या संरक्षणार्थ आपले जीवन अर्पण केलेल्यांच्या आई-वडिलांचे हुंदके, त्यांच्या जीवनसाथींच्या भग्न मनांतून निघणारे आक्रोश, लहान मुलांनी फ़ोडलेले टाहो हे सर्व आवाज जर या देशाच्या आंधळ्या न्यायदेवतेच्या कानापर्यंत पोचत नसतील व या गुन्हेगारांना केवळ सत्तेच्या दडपणामुळे शासन देणे हिला जमत नसेल तर ही न्यायव्यदेवता केवळ आंधळी वा बहिरीच नाही, तर संपूर्ण पांगळी झाली आहे असे नमूद करावे लागेल.

0 Comments:

Post a Comment

<< Home