Name:
Location: Pune, Maharashtra, India

12.31.2006

एकेकाळी 'पांढरा हत्ती' म्हणून ओळखली जाणारी भारतीय रेलवे नफ़्यात आणून दाखवल्याबद्दल सध्या लालुप्रसाद यादव यांच नाव जगभर गाजतय. त्यामुळे रेलवे कडून प्रवाशांच्या अपेक्षा वाढण अपेक्षीत आहे. पण अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये पण रेलवेच्या ग्राहकांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच काय?

काल मुंबईतील सर्वात गजबजलेल्या दादर स्थानकावर मला आलेला अनुभव बघता भारतीय रेलवेबद्दल चाललेला प्रचार हा फ़क्त एका राजकीय खेळीचा भाग तर नाही असा संशय मला येउ लागलाय.

नवीन संगणकीकृत तिकीटीकरणामुळे कुठल्या कंत्राटदाराचे भले झाले हे रेलवेलाच माहित पण एक तिकीट छापून यायला लागणारी २ मिनिटे आणि कायम मोडलेले अथवा बिघडलेले प्रिंटर, अतिशय उद्धट आणि अप्रशिक्षीत कर्मचारीवर्ग यामुळे काल मला खिडकी पर्यंत पोचायला दीड तास लागला. मी खिडकीशी पोचल्यावर तिकीटाची भेंडोळी संपल्यामुळे व तिथल्या कर्मचा-यांना नविन भेंडोळे प्रिंटरला लावता न आल्यामुळे खिडकीच बंद करण्यात आली. माझ्याकडे प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या 'व्हॅलीडेटींग कुपन' होती. पण ती 'व्हॅलीडेट' करणारी यंत्रच जागेवर नसल्यामुळे खर तर मला रांगेत उभे रहावे लागले होते. कर्मचा-यांना त्या यंत्रांबद्दल अथवा 'कुपन' वर मारायला ठेवलेल्या शिक्क्यांबद्दल विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. 'स्टेशन मास्तर' कडे गेल्यावर 'तुम्हाला एवढ्या रुबाबात विचारायच असेल तर तिकडे 'मुंबई सेंट्रल' ला जाउन तक्रार करा' असे उत्तर मिळाले. "तुमचे नाव काय" विचारल्यावर सुकुमारन असे उत्तर मिळाले. "तुम्ही तक्रार करा मी पाहून घेतो कोण काय बिघाडतय माझ" असे उर्मट उत्तर मिळाले. शेवटी एका अधिका-याने आम्हाला त्याच्याकडील शिक्के मारून 'कुपन' 'व्हॅलीडेट' करून दिली. "व्हॅलीडेटींग मशीन' चा ठेका घेतलेले त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, सतरा शिक्के ठेवले होते ते चोरीला गेले आणि 'प्रिंटर' ची देखभाल करणारी कंपनी बरोबर काम करत नाही, मग आम्ही काय करु साहेब?" हे स्टेशन मास्तरचे केविलवाणे बोल ऐकून काही प्रश्न मनात आले.

- रेलवे नफ़्यात आली पण प्रवाशांना होणा-या त्रासात किती भर पडली?
- 'रीटर्न' आरक्षणावर १० रुपये जादा आकारण्यात येतात त्याचे कारण काय?
- रेलवेच्या गि-हाईकाला कशी वागणूक द्यावी याचे प्रशिक्षण कर्मचा-यांना मिळत नाही का?
- एकदा कंत्राट दिल्यानंतर त्यातील अटींचे पुरेपूर पालन केले जाते का यावर रेलवे लक्ष ठेवते का?
- जागतीक पातळीवर जाण्याची भाषा बोलणा-या रेलवेला सर्वप्रथम मुलभूत बाबींकडे लक्ष देणे व फक्त नफ्या-तोट्याच्या व हितसंबंधांच्या कचाट्यातून बाहेर येणे जमाणार आहे का?

एकूणच नफ्यात आलेल्या या संस्थेकडून ती अधीक मग्रूर व मुजोर न होता लोकांना अधीकाधीक सुखसोयी पुरवेल अशी माफक अपेक्षा आहे.

0 Comments:

Post a Comment

<< Home