anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

5.25.2006

पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार ...
माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय ...
मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?

या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...

मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...
आणि आपले रोजच ...
कुढत कुढत मरायचे ...

5.16.2006

युगंधर पुस्तकात अनेक प्रकारच्या बाणांविषयी लिहिलय. त्यातल्या एका प्रकाराबद्दल मनात खुपच औत्सुक्य निर्माण झालय.तो बाण शरीरात गेल्यावर जितका त्रास होतो त्याहुन जास्त त्रास शरीरातून बाहेर काढताना होतो. बाण रक्तनलिका कापल्याखेरीज व स्नायु फ़ाडल्याशिवाय बाहेर येउच शकत नाही असे वर्णन आहे त्याचे!त्याच्या टोकाला जर विष लावले असेल तर? हा म्हणजे "धरल तर चावतय, सोडल तर पळतय" अशातलाच प्रकार!

पण यापेक्षाही अधीक धोकादायक बाण या जगात अस्तित्वात आहे! वर उल्लेखिलेला बाण तरी फ़क्त शरीरात जखमा करतो.पण ह्या बाणाने केलेल्या जखमा थेट मनालाच होतात!आणि मनाला झालेल्या जखमा सहसा भरुन येत नाहीत! हा सर्वशक्तिमान बाण आहे वाक‍बाण!

कुठल्याही शस्त्राने होणार नाही एवढी हानि तोंडून निघालेले शब्द करुन जातात! साक्षात ब्रम्हास्त्र सुद्धा एक वेळ मागे घेता येइल, पण मुखातून सुटलेला शब्दरुपी बाण कधीच मागे घेता येत नाही! आणि त्यातूनच जर तो आपल्या प्रिय व्यक्तीच्या मुखातून आला असेल तर? दृष्य स्वरुपात नसली तरी कायम ठसठसत राहणारी एक वेदना आयुष्याच्या अंतापर्यंत आपली सोबतीण होते!

अशी एखादी जखम स्वत:च्या मनात ठसठसायला लागली की प्रत्यक्षात साक्षात सुर्याचा पुत्र असलेल्या व केवळ दैवयोगापायी आयुष्यभर 'सुतपूत्र' म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाबद्दल सहानुभूती निर्माण होते.
कर्णाला "मला एकदा आई म्हण" अशी भिक्षा मागणा-या कुंतीला कर्णाने काय उत्तर दिले असेल याचा विचार करता करता सहज मनात आलेल्या ४ ओळी लिहुन आजचे लिखाण संपवतो!

कुंती वदली अरे कर्णा फ़क्त एकदाच म्हण मला आई!
राजमाता संबोधून का घायाळ करतोस मातेच्या हृदया?
कर्ण वदला कुठे होती ह्या आईची पुण्याई?
जेव्हा "सूतपुत्र" शब्दरुपी बाण करीत होते या कर्णाची मृगया?

5.12.2006

"याचा भाव किती असेल?" हे वाक्य ऐकल रे ऐकल की अंगाला दरदरून घाम फ़ुटतो माझ्या!आणि त्यात जर हे वाक्य एखाद्या स्त्रीच्या तोंडून बाहेर पडले तर संपलच!"तुम्ही जो भाव सांगाल भागीले दोन वजा दहा रुपये" हे सुत्र आयुष्यभर लक्षात ठेवण्यातच खरा पुरुषार्थ आहे!

"कानातली कितीला घेतली?" याचे उत्तर भारीतली दिसताहेत अस समजून "२५ रुपये" अस दिल्यावर जर "१० रुपयात अश्या ३ जोड्या" हे मिळत असेल तर शहाणा मनुष्य काय करेल?पुढच्या वेळी "अरे व्वा, ५ रुपयाची वस्तू सुद्धा किती चोखंदळपणे निवडता ग तुम्ही बायका! काय सौंदर्यद्रुष्टी असते बायकांची! आपल्याला नाही बुवा जमायच!" असा हुकमी संवाद टाकला रे टाकला की "काय हे! पुरुषांना काडीची अक्कल नसते खरेदीची! येवढी ५०० रुपयांची कानातली आणली तर त्याची तुलना ५ रुपयाच्या त्या फत्र्या कानातल्याशी करावी? तरी बर, १०००च म्हणत होता मेला, कस बस त्याला ५०० रुपयात गप्प केल!"हेच उत्तर ऐकु येणार!

भाजीला गेल्यावरसुद्धा हाच अनुभव! "कोथिंबीर काय भाव?" च उत्तर "३ रुपयाला जुडी" अस आल की शहाणा मनुष्य पुढच्या भाजीवाल्याकडे जातो. आणि "एखादी रणचंडीका शत्रुच्या छाताडावर तलवारीच टोक ठेवुन ज्या विजयी अविर्भावाने जगाकडे द्रुष्टी टाकेल" तश्या नजरेने "५ रुपयात ३ जुड्या ( व सोबत कढिलिंब मिरच्या त्या वेगळ्याच!)" घेउन आलेली स्त्री आपल्याला खिजवत निघून जाते!

या युगानुयुगे उगाळल्या गेलेल्या गोष्टीवर मी आज परत भाष्य करण्याची गरजच काय?गरज आहे! आजचा दिवस "सोनियाचा दिन" आहे!(सोनिया गांधी चार लाख मतानी निवडणूक जिंकली म्हणून म्हणत नाहीये मी!)
आज मी जिंकलोय!

पुस्तकांबद्दल काहीच माहिती नसलेल्या एका स्त्रीनी 'कव्हर' बघुन ९०० रुपयाला आणि माहिती असलेल्या स्त्रीने लोकप्रियता बघुन ७५० रुपयाला असेल असा अंदाज व्यक्त केलेली पुस्तके मी ६०० रुपयात घेउन आलोय!

ता.क. खर तर बाजुच्या दुकानात नंतर तीच पुस्तक ५५० रुपयात मिळाली माझ्या एका मित्राला!पण हिंदी चित्रपटातल्या सारख "ये राज राज ही रहना चाहिये मेरे दोस्त" याचा बंदोबस्त मी करून आलोय १ प्लेट भजी आणि १ कोका-कोलाच्या बदल्यात ...

5.09.2006

हुश्श...रोज ब्लॉग लिहीन म्हणण सोप पण आचरणात आणण महा कर्मकठीण!वेळ मिळत नाही ही सबब पुरेशी नाही ...आजपासून रोजच्या घडामोडींवरील भाष्य करायचा प्रयत्न करतो!


सध्या क्रीकेट पण बन्द आहे .. जगभरातले खेळाडू सध्या अति-क्रिकेट च्या नावानी बोंब मारताहेत ... सेहवागने पण ही बोंब मारावी म्हणजे अतीच झाले! त्याच्या सारख्या "प्रेक्षक मैदानात येण्यापुर्वीच आपण तंबूत जाउन बसणे" हे ब्रीदवाक्य असलेल्या खेळाडूला कसला आलाय अति-क्रिकेट चा त्रास?



प्रमोद महाजनांवर हल्ला झाला त्या दिवशी मामाचा फोन ...
मामा : "काय रे घोडा वगैरे आहे का तुझ्याजवळ?"
मी : "नाही ...अजुन तरी नाही"
मामा : "बर झाल ... मी अर्ध्या तासात तुला भेटायला येतोय"

कलियूग आलय हेच खर!


अमिताभ बच्चन ने स्वत: शेतकरी असल्याचा पुरावा न्यायालयात मांडला ...तो "एन.आर.आय." होताच, आता "एन. आर. आय. शेतकरी" झाला!या देशात धनिकांना सगळ शक्य आहे ...सर्व काही माफ़ आहे ....पुढची पायरी? "दारीद्र्‌य-रेषेखालील एन.आर.आय. शेतकरी" ( शेतजमीन विदर्भातली ... अनुदान लाटायला मोकळे! )

आजच्या पुरते एवढेच ... :-)